राज ठाकरे पूर्वी असे नव्हते, भाजपाच्या दबावामुळे ते असं बोलताय; खूप वाईट वाटतंय, रुपाली पाटलांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 02:12 PM2022-12-01T14:12:55+5:302022-12-01T14:13:35+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
नेस्को मैदानातील मेळाव्यात बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरीच थांबण्यावरून टोला लगावला होता. काल-परवा मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर आहेत असे…मुख्यमंत्री पदावर असताना ते तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणाऱ्यातला मी नाही. स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं, अशी टीका केली होती.
राज ठाकरेंच्या या टीकेवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे पूर्वी असे नव्हते. मी त्यांच्यासोबत १६ वर्षे काम केलंय. आता खूप वाईट वाटतं. भाजपाच्या दबावामुळे राज ठाकरे आता असं बोलताय. कोरोनाकाळात विरोधक देखील घरीच होते. उद्धव ठाकरेंनी कोरोना असताना चांगलं काम केलं, असं म्हणत रुपाली पाटील यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी आज पंढरपुरात माध्यमांशी संवाद साधला
दरम्यान, मी जी टीका केली ती आरोग्यावर नव्हे तर परिस्थितीवर होती. हा विषय आरोग्याचा किंवा प्रकृतीचा नाही. आता काही समस्या नाही. कुणाच्याही आरोग्याबाबत सुधारणाच व्हावी. लोकांना भेटायचं टाळत होता पण मुख्यमंत्री पदावरून उतरल्यावर भेटी सुरू झाल्या, दौरे काढले. मग तेव्हा का नाही भेटले? कित्येक लोकांना वर्षावर ताटकळत ठेवायचे. ही प्रकृतीची नव्हे परिस्थितीशी चेष्टा होती असं राज ठाकरेंनी सांगितलं.
पक्षाला सत्तेत येण्यासाठी काळ जातो-
राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली तेव्हा काँग्रेसमधील १ गट उठला आणि पक्ष स्थापन केला. माझ्या पक्षाला १६-१७ वर्ष झाली. २०१४ ला भाजपाच्या हाती सत्ता आली. परंतु १९५२ मध्ये भाजपाची स्थापना झाली. प्रत्येक गोष्टीला काही काळ लागतो. शिवसेना १९६६ साली जन्माला आली. मुंबई महापालिका यायला २५ वर्ष लागली असंही राज ठाकरे म्हणाले.
मी माझं काम करतो, दुसऱ्याचं नाही-
कुठलाही लढा हा प्रस्थापितांच्या विरोधात असतो. प्रत्येक पक्षाचं, संघटनेचं अंतर्गत काम सुरू असते. ते जाहीरच करावं असं काही नाही. अनेक ठिकाणी नवीन पदाधिकारी नेमणुका होतायेत. संघटनात्मक बदल होत असतात. ज्यांना आमची ताकद बोचते ते अशाप्रकारचे आरोप करतात. मी माझ्यासाठी काम करतो. कुणासाठी काम करत नाही. मी माझ्या पक्षाचं आणि महाराष्ट्राचं काम करतो त्यामुळे ज्यांना टीका करायची त्यांना करत राहू द्या असं सांगत राज ठाकरेंनी भाजपाची स्क्रिप्ट वाचतायेत या विरोधकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले.