राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांचा 'स्वखुशीने दिलेला' राजीनामा त्वरित मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 06:19 PM2019-08-27T18:19:34+5:302019-08-27T19:12:45+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय आमदार दिलीप सोपल यांनीही राष्ट्रवादीला राम राम करत पवारांची साथ सोडली.
सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचेआमदार दिलीप सोपल यांनी आपल्या आमदारकीचाराजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या औरंगाबाद येथील घरी जाऊन सोपल यांनी आपल्या विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला. यावेळी आमदार सोपल यांच्यासमवेत उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर हेही उपस्थित होते. तसेच सोपल यांची निकटवर्तीय कार्यकर्तेही सोबत होते. आमदार सोपल हे उद्या बुधवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय आमदार दिलीप सोपल यांनीही राष्ट्रवादीला राम राम करत पवारांची साथ सोडली. आपल्या सोपल बंगला येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपण शिवसेना प्रवेश करत असल्याची घोषणा सोपल यांनी केली होती. त्यानंतर, आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या औरंगाबाद येथील घरी जाऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणासाठी आपण राजीनामा देत असल्याचं सोपल यांनी म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही सोपल यांचा राजीनामा मंजूर केला आहे. आता, 28 ऑगस्ट रोजी सोपल आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
सोपल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर सोपलांचा शिवसेना प्रवेश राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या 2 आठवड्यात मी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर, प्रवेशाचा निर्णय सर्वांनी मिळून घेतला. सोपल यांची राजकीय जडणघडणच खासदार शरद पवार यांच्यासमवेत झाली. त्यामुळेच, सोपल यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतरही सोपल यांनी पवारांशी स्नेह कायम ठेवला होता. राष्ट्रवादीकडून सोपल यांना मंत्रीपदही देण्यात आलं होतं. तसेच, आघाडी सरकारच्या काळात पणन महामंडळाचे अध्यक्षपदही सोपल यांना मिळालं होतं. त्यामुळे सोपल राष्ट्रवादी सोडणार नाहीत, असे शरद पवारांसह, अजित पवारांनाही वाटत होते. मात्र, सोपल यांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विश्वास फोल ठरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांचा राजीनामा pic.twitter.com/vREWm8RTdk
— Lokmat (@MiLOKMAT) August 27, 2019