कोल्हापूरनंतर आणखी एका मतदारसंघात पवार नवा डाव टाकणार; माढ्यातून महादेव जानकर लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 09:05 PM2024-02-21T21:05:43+5:302024-02-21T21:08:31+5:30

कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केल्यानंतर आता माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून रासपचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे.

ncp sharad Pawar will make a new move in one more constituency after Kolhapur Mahadev Jankar will fight from Madha | कोल्हापूरनंतर आणखी एका मतदारसंघात पवार नवा डाव टाकणार; माढ्यातून महादेव जानकर लढणार?

कोल्हापूरनंतर आणखी एका मतदारसंघात पवार नवा डाव टाकणार; माढ्यातून महादेव जानकर लढणार?

Sharad Pawar Madha Lok Sabha ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या चाणाक्ष राजकीय डावपेचांसाठी ओळखले जातात. संकटात संधी निर्माण करत पवार यांनी याआधी अनेकदा मतदारसंघांची राजकीय गणिते बदलून दाखवली आहेत. अशातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा सक्रिय झाले असून महाविकास आघाडीची शक्ती कमी असलेल्या मतदारसंघांमध्ये नवे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केल्यानंतर आता माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून रासपचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यामध्ये आज फोनवर आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

महादेव जानकर हे मागील काही काळापासून भाजपसह महायुतीवर नाराज असल्याचं दिसत आहे. जानकर यांनी अनेकदा भाजपविरोधात वक्तव्य करत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्तही केली आहे. त्यामुळे जानकर यांना महाविकास आघाडीकडे खेचण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला असल्याचे समजते. धनगर समाजाचे नेते अशी ओळख असलेले महादेव जानकर हे महाविकास आघाडीसोबत आल्यास काही मतदारसंघांतील गणिते बदलू शकतात. तसंच मी स्वत: परभणी किंवा माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं जानकर यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. परभणी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव विद्यमान खासदार असल्याने ही जागा जानकर यांना सोडता येणार नाही. त्यामुळेच शरद पवार हे माढ्यासाठी जानकरांच्या नावाचा विचार करू शकतात.  

कसं आहे माढ्याचं गणित?

२००९ पासून अस्तित्वात आलेल्या माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील चार आणि साताऱ्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पहिल्यावेळी  शरद पवार यांनी तर दुसऱ्यांदा २०१४ ला राष्ट्रवादीचे उमेदवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी नेतृत्व केले. तिसऱ्यावेळी मात्र, राष्ट्रवादीचा पराभव करत भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर खासदार झाले. त्यावेळी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळेच भाजपला विजयाचे तोंड पाहता आले. सध्या मतदारसंघातील सहाही आमदार महायुतीत आहेत.

माजी मंत्री महादेव जानकर यांनी चार दिवसांपूर्वीच फलटणमध्ये मोठी सभा घेऊन माढा लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे. या मतदारसंघातून जानकर स्वत: उभे राहिल्यास खूप मोठा राजकीय बदल होऊ शकतो. कारण, २००९ च्या निवडणुकीत त्यांनी एक लाख मते मिळवली होती. आज रासपची ताकद वाढली आहे. त्यामुळे जानकर हे माढ्याबरोबरच इतर मतदारसंघातही भाजपला डोकेदुखी ठरु शकतात.

Web Title: ncp sharad Pawar will make a new move in one more constituency after Kolhapur Mahadev Jankar will fight from Madha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.