पवारांच्या राजकीय शिष्यासाठी ‘राष्ट्रवादी’चे आजी-माजी नेते सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:07 PM2019-04-11T12:07:08+5:302019-04-11T12:08:15+5:30
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी लागले कामाला
राकेश कदम
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपले राजकीय गुरु असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे नेहमीच सांगतात. पवार यांच्या राजकीय शिष्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते नेटाने कामाला लागले आहेत. काँग्रेसच्या तुलनेत शहरात राष्ट्रवादीची संघटनात्मक शक्ती कमी असली तरी प्रचार यंत्रणा काँग्रेस इतकीच प्रभावी ठरली आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी शरद पवारांनी दोन जाहीर सभा घेतल्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढत तिरंगी असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेरजेच्या समाजकारणाला प्राधान्य द्यावे, असा कानमंत्र दिला. त्यानुसार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, शहरातील विविध समाज घटकांना शिंदे यांच्यासोबत जोडण्याचे काम करीत आहेत. शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या मुद्यावरुन नगरसेवक रान पेटवित आहेत. त्यांच्या मदतीला माजी महापौर मनोहर सपाटे, युन्नूस शेख, महेश गादेकर, नाना काळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनिता रोटे, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, ओबीसी सेलचे अध्यक्ष दिलावर मणियार, अल्पसंख्याक सेलचे राजू कुरेशी, फारुक मटकी, व्हिजेएनटी सेलचे संजय सरवदे, महंमद इंडिकर, विधी सेवा सेलचे हरिभाऊ पवार, अंकलगी, बाबासाहेब जाधव यांच्याकडूनही मदत होत असल्याचे पाहायला मिळाले.
ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील काँग्रेसला मताधिक्य देण्याची पैजही लावली असून त्याची सर्वाधिक चर्चा आहे. मोहोळ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेसला येथून मताधिक्याची अपेक्षा आहे. मोहिते-पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे पंढरपूर, मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला फटका बसला असला तरी जुने कार्यकर्ते सक्रिय आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यात पूर्वीप्रमाणे मोजके काम सुरू आहे.
तरुणांचा उत्साह चांगला
काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. सर्वजण एकदिलाने काम करीत आहे. तरुणांचा उत्साह तर चांगला आहे. ज्येष्ठ नेते या कार्यकर्त्यांना चांगली मदत करीत असल्याचे पाहायला मिळते.
- सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस
लोकशाहीसाठी ही निवडणूक महत्त्वाची
लोकशाही टिकविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीत समाजातील सर्व घटकांना जोडण्याचे काम आम्ही करीत आहोत. भाजपच्या लबाडीचा पर्दाफाश करण्याचे कामही राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी करीत आहेत.
- संतोष पवार, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी
विधानसभा मतदारसंघातील मित्रपक्षांच्या कार्यालयांत काय दिसले ?
- १. शहर उत्तर : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह आजी-माजी पदाधिकाºयांवर जबाबदारी आहे.
- २. मंगळवेढा : ऐन निवडणुकीत शहराध्यक्ष, तालुका अध्यक्षाने राजीनामा दिला. सध्या राहूल शिंदे, राजेंद्र हजारे, लतिफ तांबोळी, भारत पाटील यांच्या माध्यमातून काम सुरू आहे.
- ३.शहर मध्य. : जाधव, पवार यांच्यासह नगरसेवक किसन जाधव, सुनिता रोटे, युवक अध्यक्ष बबलू खुणे यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी काम करीत आहेत.
- ४. दक्षिण सोलापूर : माजी सभापती दादाराव कोरे, राज साळुंखे, विलास लोकरे, अमीर शेख, सागर चव्हाण यांच्यासह नव्या कार्यकर्त्यांनी प्रचार यंत्रणा सांभाळली आहे.
- ५.अक्कलकोट: तालुक्यातील राष्ट्रवादी विस्कळीत झाली आहे. या परिस्थितीतही दिलीप सिध्दे, तालुकाध्यक्ष बंदेवनाज खोरगू यांनी प्रचार यंत्रणा लावली आहे.
- ६. मोहोळ : माजी आमदार राजन पाटील, झेडपी सदस्य बाळराजे पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनीच प्रचार यंत्रणा लावली आहे.