पंढरपुरात चंद्रभागेतील दुर्घटना टाळण्यासाठी एनडीआरएफचे पथक येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 02:20 PM2019-11-04T14:20:20+5:302019-11-04T14:24:50+5:30

पंढरपुरात कार्तिकी वारीची तयारी;  नदी दुथडी भरून वाहतेय, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक सर्तक

NDRF squad will arrive in Pandharpur to prevent the tragedy | पंढरपुरात चंद्रभागेतील दुर्घटना टाळण्यासाठी एनडीआरएफचे पथक येणार

पंढरपुरात चंद्रभागेतील दुर्घटना टाळण्यासाठी एनडीआरएफचे पथक येणार

Next
ठळक मुद्देकार्तिकी यात्रेची तयारी प्रशासनाकडून सुरू जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या परतीच्या पावसामुळे यंदा प्रथम कार्तिकी यात्रेदरम्यानही चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे

पंढरपूर : गेल्या तीन महिन्यांपासून चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. शिवाय शुक्रवारी कार्तिकी वारी आहे. या वारीसाठी पंढरीत लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येतात. हे भाविक प्रथम चंद्रभागेत पवित्र स्नान करतात़ स्नान करताना दुर्घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत यंदा प्रथमच प्रशासनाने एनडीआरएफचे पथक तैनात केले आहे. हे पथक ५ नोव्हेंबर रोजी पंढरपुरात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

यावर्षी आॅगस्ट आणि आॅक्टोबर महिन्यात अशा दोनवेळा चंद्रभागा नदीला पूर आला होता़ सलग तीन महिने चंद्रभागा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे़ दरम्यानच्या काळात पंढरीत आलेले भाविक स्नान करताना पाय घसरून किंवा पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती़  सध्याही चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. शिवाय कार्तिक वारी सोहळ्यासाठी राज्यातून लाखो भाविक येतात़ त्या पार्श्वभूमीवर दुर्घटना टाळण्यासाठी एनडीआरएफच्या पथकास पाचारण करण्यात आले आहे.

कार्तिकी यात्रेची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बैठक घेऊन सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. परतीच्या पावसामुळे यंदा प्रथम कार्तिकी यात्रेदरम्यानही चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. चंद्रभागा पात्र पूर्णपणे पाण्याने व्यापले आहे. एकादशी सोहळ्यासाठी आल्यानंतर भाविक चंद्रभागा स्नानासाठी जात असतात. अशावेळी कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी एनडीआरएफ, अकोला येथील संस्थेचे स्वयंसेवक तसेच ५० जीवरक्षकही यात्रा काळात नदीपात्राच्या ठिकाणी कार्यरत असतील.  ५ नोव्हेंबर नंतर या टीम पंढरपूर येथे दाखल होणार आहेत. 

सध्या घाटाच्या ठिकाणांहून होड्या चालविण्यात येत आहेत. त्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक बसू नयेत यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. यात्रा काळात नागरिकांना आवश्यक ती दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

कोळी बांधवही असतील मदतीला
- पंढरपुरातील चंद्रभागेत सुमारे २०० होड्या आहेत. जेव्हा जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली तेव्हा कोळी बांधवांनी प्रशासनाला मदत केली आहे. आताही कार्तिकी वारी सोहळ्यादरम्यान यामुळे प्रथमच एनआरडीएफचे पथक येणार आहे. त्यांच्या मदतीला कोळी बांधव असतील. सध्या चंद्रभागेचे पाणी घाटापर्यंत आहे. शिवाय काही स्वीमरही तयार आहेत, अशी माहिती गणेश अंकुशराव यांनी दिली़

Web Title: NDRF squad will arrive in Pandharpur to prevent the tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.