पंढरपुरासमीप आली वैष्णवांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 06:06 AM2019-07-10T06:06:39+5:302019-07-10T06:06:44+5:30
वारकऱ्यांचा धावा; दोन संतबंधूंची भेट, सर्व दिंड्या पंढरपूरच्या दिशेने
- शहाजी फुरडे-पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : ‘तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा’ अशी हाक देत तोंडले-बोंडलेच्या उतारावर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात भक्तीमय वातावणात धावा पूर्ण केला आणि संत सोपानकाका, संत ज्ञानेश्वर माऊली या बंधूद्वयांच्या संगतीने रात्री पिराची कुरोली गाठली. उद्या बुधवारी बाजीरावची विहीर येथे दोन्ही पालख्यांची चार रिंगणे होणार आहेत.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बोरगावचा मुक्काम आटोपून तोंडले-बोंडलेच्या दिशेने निघाला़ तोंडले-बोंडले गावाच्या अलीकडे उतारावर एकदा पंढरीच्या दिशेने नजर टाकली आणि ‘तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा’ म्हणत वारकरी पंढरीच्या दिशेने धावण्यास सुरूवात केली. भक्तीमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यात सर्व दिंड्या पंढरपूरच्या दिशेने वेगाने पळू लागले़ या दरम्यात संत श्रेष्ठ सोपानकाका महाराजांची पालखी बोंडले येथे दाखल झाली़ यावेळी संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका महाराज यांच्या भेटीचा सोहळा पार पडला़
निवृत्तीनाथांनी ओलांडला लाखाचा टप्पा
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीत सहभागी वारकºयांच्या संख्येने यंदा प्रथमच एक लाखाचा टप्पा ओलांडत सव्वा लाखाहून अधिक वारकºयांपर्यंत मजल मारली आहे, अशी माहिती पालखी समन्वय पुंडलिक थेटे यांनी दिली. पालखीने मंगळवारी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करुन करकंब येथे मुक्काम केला. आता अवघे दोन मुक्काम उरले आहेत. संत एकनाथ, संत मुक्ताबाई या पालख्यानीही पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला आहे.
रिंगणावर सावट : पंढरपूर समीप आल्याने आनंदित झालेले वारकरी हे रिंगण खेळ खेळून आपला आनंद द्विगुणित करतात. वाखरी शिवारातील बाजीराव विहीर येथे दोन्ही पालख्यांची मिळून चार ंिरंगणे होतात. उभी रिंगणे रस्त्यावर होतात. पण गोल रिंगणे शेतात होतात. मात्र शेतात चिखल असल्याने रिंगणाबद्दल वारकºयामधून चिंता व्यक्त केली जात आहे.
दोन बंधूंची भेट
उघडेवाडीच्या (ता. माळशिरस) शेतात ठाकुरबुवाच्या समाधीजवळ गोल रिंगणाचा अन् उडीचा खेळ खेळून चैतन्याने फुललेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने तोंडले येथे नंदाच्या ओढ्याकाठी विश्रांती घेऊन पंढरपूरची वाट धरली.
पंढरपूर तालुक्याच्या हद्दीवर टप्पा येथे धाकटे बंधू सोपानदेवांची भेट घेऊन पालखी रात्री भंडीशेगावला (ता. पंढरपूर) मुक्कामी गेली.
याच मार्गाने तुकाराम महाराज पालखीही जात असल्याने अनेक संतांच्या पादुकांचे दर्शन भाविकांना लाभले.