इतिहासाचे पुनर्लेखन करताना सम्यक दृष्टिकोन आवश्यक, आ़ ह़ साळुंखे यांचे मत, सोलापूरात समकालीन समस्या आणि आव्हाने विषयावर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:49 PM2018-02-10T12:49:01+5:302018-02-10T12:51:22+5:30
प्रस्थापितांच्या इतिहास लेखनाला प्रत्युत्तर म्हणून पुनर्लेखन करताना तटस्थता आवश्यक आहे़ इतिहास संशोधकांनी भावनिकता, अभिनिवेष, पूर्वग्रहदूषितपणा टाळून समतोल मांडणी करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राच्यविद्यासंशोधक डॉ़ आ़ ह़ साळुंखे यांनी केले़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर : प्रस्थापितांच्या इतिहास लेखनाला प्रत्युत्तर म्हणून पुनर्लेखन करताना तटस्थता आवश्यक आहे़ इतिहास संशोधकांनी भावनिकता, अभिनिवेष, पूर्वग्रहदूषितपणा टाळून समतोल मांडणी करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राच्यविद्यासंशोधक डॉ़ आ़ ह़ साळुंखे यांनी केले़
वालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयात आयोजित सामाजिक शास्त्रातील समकालीन समस्या आणि आव्हाने विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले़ याप्रसंगी विश्वस्त भूषण शहा, प्ऱ प्राचार्य डॉ़ चंद्रकांत चव्हाण, समन्वयक डॉ़ धनराज पाटील, डॉ़ सिद्राम सलवदे यांची प्रमुख उपस्थिती होती़
आपल्या अभ्यासपूर्ण बीजभाषणात तथागत गौतम बुद्धांपासून अमर्त्य सेनापर्यंत अनेक उदाहरणे देत डॉ़ साळुंखे यांनी सामाजिक शास्त्रासमोर उभ्या असलेल्या शेतकरी आत्महत्या, आर्थिक विषमता, स्त्रीभू्रणहत्या, जातीय व धार्मिक असहिष्णुता आदी ज्वलंत विषयांचा ऊहापोह केला़ समाजाला दिशा देण्याचे काम प्राध्यापकांचे असल्याचेही ते म्हणाले़
प्राचार्य डॉ़ चंद्रकांत चव्हाण म्हणाले, स्वत:च्या धडावर स्वत:चे डोके असण्याचे भान समाजशास्त्रांच्या तर्क निष्ठ अभ्यासातून प्राप्त होते़ मनुष्य हा समाजशील प्राणी असून मानवी विकासात समाजशास्त्राचे योगदान महत्त्वाचे आहे़ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ़ धनराज पाटील यांनी केले तर अतिथींचा परिचय डॉ़ अशोक गायकवाड यांनी करून दिला़ सूत्रसंचालन प्रा़ मनोहर जोशी यांनी केले तर आभार डॉ़ संगमेश्वर नीला यांनी मानले़ यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.