‘सामानगड’चा वारसा जपण्याची गरज
By admin | Published: December 19, 2014 09:43 PM2014-12-19T21:43:41+5:302014-12-19T23:30:13+5:30
१६६७ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी तो आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यानंतर १६७६ मध्ये शिवरायांनी किल्ल्याची डागडुजी केली.
राम मगदूम - गडहिंग्लज \किल्ले सामानगड हा शिवकालीन किल्ला आहे. १२ व्या शतकात राजा दुसरा भोज यांनी हा किल्ला बांधला. भोज राजवटीच्या अस्तानंतर हा किल्ला आदिलशहाकडे गेला. १२.३४ हेक्टर क्षेत्रफळातील अंडाकृती आकाराच्या डोंगरावर हा किल्ला आहे.१६६७ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी तो आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यानंतर १६७६ मध्ये शिवरायांनी किल्ल्याची डागडुजी केली. याठिकाणी सैन्याची रसद, शस्त्रे व दारुगोळा ठेवला जात असे. सर्वांत लहान, परंतु मजबूत किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख होती.
१८४४ मध्ये करवीर संस्थानचे मंत्री दाजी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सामानगडाच्या गडकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले होते. बंडात या गडाचा गडकरी मुंजाजी कदम शहीद झाला. जनरल डिलामोटे यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी हा किल्ला काबीज केला व किल्ल्याची नासधूस केली. त्यानंतर सामानगडावरील मामलेदार कचेरी गडहिंग्लज गावी हलविण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांनी या किल्ल्याला भेट देऊन काही काळ वास्तव्य केल्याची नोंद आहे. प्रसंगवशात समर्थांनी शिवरायांच्या समक्ष पाषाण फोडून जिवंत बेडकी काढल्याची घटना याच किल्ल्यातील असल्याचे वर्णन समर्थ चरित्रात आढळते.
कोल्हापूरपासून ८० कि.मी. अंतरावर आग्नेय कोपऱ्यात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्र सपाटीपासून २९७२ फूट उंचीवर हा किल्ला आहे. किल्ल्यास भक्कम तटबंदी असून टेहळणीसाठी प्रवेश बुरूज, झेंडा बुरूज, वेताळ बुरूज, शेंडा बुरूज असे लहान मोठे दहा बुरूज आहेत.
२००६ मध्ये स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने सामानगडाचा ‘क’ वर्ग पर्यटनस्थळामध्ये समावेश झाला आणि किल्ल्याच्या विकासासाठी एक कोटी ३३ लाखांचा निधी मिळाला. त्यातून किल्ल्यावर यात्री निवास, उपहारगृह, विहिरींना संरक्षक कठडे, बगीचा, अंतर्गत रस्ते, डॉरमेटरी, धर्मशाळा, बालोद्यान व सांस्कृतिक सभागृह, इत्यादी कामे झाली. स्व. डॉ. ए. डी. शिंदे यांनी किल्ल्यावरील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार केला.
दरवर्षी महाशिवरात्रीला गडावरील हनुमान देवाची यात्रा भरते. पंचक्रोशीतील सात पालख्यांची यात्रेत भेट होते. इतिहास संशोधक व अभ्यासकांसह पर्यटक व भाविक गडाला भेट देतात. याशिवाय शाळा-महाविद्यालयांच्या सहली येतात. मात्र, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्धी व विकासापासून दूर हा किल्ला अजून दूरच आहे. अलीकडे देखभाली अभावी तटबंदी व बुरूज ढासळले आहेत. पर्यटन विकास निधीतून बांधलेल्या गडावरील इमारतींची व फर्निचरची मोडतोड झाली असून, वीज व पाणी पुरवठादेखील बंद आहे. उपहारगृह सुरूच नसल्याने भाविक व पर्यटकांची गैरसोय होत आहे.
ऐतिहासिक महत्त्व
छ. शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या या किल्ल्यावरील वास्तव्याची इतिहासात नोंद.
संकेश्वरनजीकच्या निडसोशी मठाचे संस्थापक आद्य शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांचा जन्म या ठिकाणीच झाल्याची नोंद आहे.
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी २१ बाय १४ आकारातील तिरंगा ध्वज या किल्ल्यावरील झेंडा बुरुजावर शासनातर्फे फडकविला जातो. मंत्रालयानंतर इतक्या मोठ्या आकारातील तिरंगा केवळ याच गडावर फडकविला जातो.
काय पहाल ?
रामदासकालीन हनुमान मंदिर, भवानीमाता मंदिर, भुयारी शिवमंदिर, सूर्य मंदिर, चाळोबा मंदिर, भीमशाप्पा मठ, अंधार कोठडी, प्राचीन गुहा, चोरखिंड व सात कमान विहीर, रामखडी (सूर्यास्त दर्शन पॉर्इंट), गायमुख तीर्थ, शाळीग्राम.