सोलापुरातील पोस्ट कोविडचे दुर्लक्षित रुग्ण केवळ ‘सिव्हिल’च्या भरवशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:07 PM2020-12-23T16:07:31+5:302020-12-23T16:09:40+5:30
नियमित तपासणी नाही : तिघांच्या मृत्यूनंतरही तक्रार नसल्याचा डॉक्टरांचा दावा
राजकुमार सारोळे
लापूर : कोरोना संसर्गानंतर पोस्ट कोवीडमुळे शहरात तिघांचा मृत्यू झाला तर ग्रामीणमध्ये एकही घटना आरोग्य विभागापर्यंत आलेली नाही. असे असतानाही पोस्ट कोवीड रुग्णांना वार्यावर सोडले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी सात ते चौदा दिवसांचा किंवा जास्त कालावधी लागतो. रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा, खोकला, कफ, अस्वस्थता जाणवते. बऱ्याचदा मायकोकार्डायटीससारखा हृदयाचा आजारही जाणवतो. डायबिटीस, हायपरटेन्शन असणाऱ्यांची लक्षणे तीव्र असतात. स्कीन रॅश येणे किंवा मानसिक अस्वस्थता मोठ्या प्रमाणात आढळते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.
शहरात पोस्ट कोवीड रुग्ण शासकीय रुग्णालयाच्या भरोशावर सोडले गेले आहेत. ग्रामीणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात सोय केली आहे पण खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्यांना रुग्णांची तपासणी केली जात नाही. आरोग्य केंद्रातही असे रुग्ण उपचारास येत नसल्याचे दिसून आले.
रक्ताचे नमुने घेतले जातात
ग्रामीण भागात पोस्ट कोवीडने रुग्ण दगावल्याची एकही तक्रार नाही. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींची १४ दिवस तपासणी केली जाते. आरोग्य केंद्रात नियमित तपासणी करावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधीत रुग्णांचे रक्त तपासणीला घेतले जात आहे. शहरात मात्र अशी सोय दिसून आली नाही.
दुर्लक्ष झाल्याची एकही तक्रार नाही..
पोस्ट कोविड रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा रुग्णांची १४ दिवस तपासणी केली जाते. आरोग्य सेवक त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवतात. आरोग्य केंद्रात उपचाराची सोय नेहमीच्या ओपीडीत केली आहे. दुर्लक्ष झाल्याची एकही तक्रार नाही.
- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी