ना ढाेल ना ताशा.. मिरवणुकीशिवाय मंगळवेढ्यात गणरायाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:24 AM2021-09-21T04:24:36+5:302021-09-21T04:24:36+5:30
मंगळवेढा : मंगळवेढा शहरात ७ व ग्रामीण भागातील २० अशा एकूण २७ गणेश मंडळांनी तसेच घरोघरी स्थापन केलेल्या ...
मंगळवेढा : मंगळवेढा शहरात ७ व ग्रामीण भागातील २० अशा एकूण २७ गणेश मंडळांनी तसेच घरोघरी स्थापन केलेल्या गणरायाची दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर ना ढोल ना ताशा ना मिरवणूक मात्र जल्लोषात ‘गणपती बाप्पा... मोरया ..पुढच्या वर्षी लवकर या..’च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही गणेश मंडळाला मिरवणुकीस परवानगी दिली नव्हती. शहर व ग्रामीण भागामध्ये २७ मंडळांनी पोलिसांकडे ऑनलाईन नोंदणी केली होती. सिद्धनकेरी भाळवणी, निंभाेणी, भोसे, मारापूर, साेड्डी, चिक्कलगी या सात गावात एक गाव एक गणपती उपक्रम मंडळाने राबवला. रविवारी सर्वच मंडळांनी शांतता राखत मंगलमय वातावरणात ‘श्रीं’चे विसर्जन केले. शहरात कृष्ण तलाव, महादेव वीर, दामाजी विहीर येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्रींचे विसर्जन होत असल्याने इथे पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. या कामी एक पोलिस निरीक्षक, चार सहायक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, ४५ पोलिस कर्मचारी व १७ होमगार्ड असा बंदोबस्त नेमला होता.
शहरात व ग्रामीण भागात फिरते गस्ती पथक लक्ष ठेवून होते. नगरपालिकेने प्रतिवर्षप्रमाणे यंदाही मूर्ती संकलन केंद्र स्थापित केले होते. घरी स्थापन केलेले गणपती कुटुंब सदस्यांनी या संकलन केंद्रात आणून जमा केले. नगरपालिका प्रशासनाने संकलित केलेल्या मूर्तींचे नंतर एकत्र विसर्जन केले.
----