ना प्रचारी थाट, ना लवाजमा.. मतदारांना आवडला तिचा फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:23 AM2021-01-23T04:23:02+5:302021-01-23T04:23:02+5:30
गावचे इलेक्शन अर्थातच ग्रामपंचायतीची निवडणूक लागत असताना प्रभाग तीनमध्ये महिला आरक्षण पडले होते. त्यावेळी हेमंत घरबुडवे यांनी मुलगी स्नेहाचा ...
गावचे इलेक्शन अर्थातच ग्रामपंचायतीची निवडणूक लागत असताना प्रभाग तीनमध्ये महिला आरक्षण पडले होते. त्यावेळी हेमंत घरबुडवे यांनी मुलगी स्नेहाचा अर्ज भरायचे ठरवले. मुलगी ग्रामपंचायत सदस्या झालेली पाहायचीय, असे त्यांनी कुटुंबात सांगितले. त्यावेळी इतर कोणी काही मत व्यक्त करण्यापूर्वी स्नेहाने वडिलांची इच्छा आहे ना, मग निवडणूक लढविणारच! असे जाहीर करून वडिलांच्या विचाराला पाठबळ दिले.
दरम्यान अर्ज भरले. एका पार्टीकडून उमेदवारी मिळणार असे निश्चित झाले. मात्र शेवटच्या क्षणी पार्टीने उमेदवारी डावलली. मुलगी स्नेहाने काहीही करून निवडणूक लढायची अन् जिंकून दाखवायचं हा विश्वास बाळगत प्रचाराला सुरुवात केली.
अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या स्नेहाच्या या प्रचारात ना राजकीय मंडळी, ना इतर काही थाटमाट. घरबुडवे कुटुंबातील सदस्यच मतदारांपर्यंत पोहोचत राहिले. प्रचार संपला, मतदान झाले अन् निकाल लागला असता, मतदारांनी स्नेहाला विजयी केल्याचे समोर आले. इतर दोन उमेदवारांचा पराभव करणारी स्नेहा ११२ मते घेऊन मीरगव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवड होणारी उच्चशिक्षित तरुणी ठरली.
वडिलांच्या इच्छेने राजकारणात उतरलेल्या स्नेहाला राजकारणात उच्चशिक्षित पाहिजेत, या हेतूनेच मतदारांनी विजयी केल्याचे दिसून येत येत आहे. आता गावासाठी खूप काही करून गावाचा विकास साधायचा, असा निश्चय स्नेहाने व्यक्त केला आहे.
२१करमाळा-स्नेहा घरबुडवे.