चिनी वस्तू हटावसाठी सोशल मीडियावरील नेटिझन्सचाही पुढाकार
By appasaheb.patil | Published: June 20, 2020 12:41 PM2020-06-20T12:41:37+5:302020-06-20T12:47:53+5:30
बहिष्कार टाकण्याचे आवाहन; फेसबुक, व्हॉट्सअॅपचे स्टेटसही चीन विरोधात
सोलापूर : आॅनलाईन आणि आॅफलाईन वस्तू विकत घेत असताना चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम आता जोर धरू लागली आहे. फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सोशल मीडियावरील नेटिझन्सनेही आता चिनी वस्तू हद्दपार करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. चिनी वस्तूंना विरोध करणाºया विविध व्हिडिओ क्लिप्सही सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पाकिस्तानसंबंधीच्या तणावातून त्यांना मदत करणाºया चीनबाबत देशवासीयांत संतापाची भावना निर्माण झाली. दरम्यान, सोमवारी रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांच्या झटापटीत २० भारतीय सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला आहे. भारतीय सैनिकांना श्रद्धांजली देताना सोशल मीडियावर लोक आपले विचार मांडत आहेत. एवढेच नव्हे तर या विकृत कृत्याबद्दल सोशल मीडियावर चीनबाबत प्रचंड संतापाचं वातावरण सोशल मीडियावर दिसून येत आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, पणत्या, खेळणी असे एकेक क्षेत्र चिनी बाजाराने स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. याचा देशातील पारंपरिक किरकोळ व्यापार पूर्णपणे संकटात आला आहे.
आधीच मॉल आणि सुपर मार्केट संस्कृतीने किरकोळ व्यापाºयांना संकटात आणले असताना त्यात चिनी मालामुळे त्यांचा व्यवसायच संपुष्टात येण्याची स्थिती निर्माण झाल्याचीही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. चिनी मालावर बहिष्कार टाका, चिनी माल विकत घेऊ नका, अशा पोस्ट सोशल मीडियावर जास्त फिरत आहेत. चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा व्हिडिओ व विदेशी हटाव...स्वदेशी अपनाओ असा टॅगही सुरू झाला आहे. दरम्यान, या मोहिमेला भावनिकतेशी न जोडता केवळ देशातील किरकोळ व्यापाराच्या दृष्टीने जोडण्यासाठी सोशल मीडियावरील नेटिझन्सनी पुढाकार घेतल्याचे चित्र दिसत आहे.
टिकटॉकवरही चीनविरोधात व्हिडिओ पोस्ट
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून चीनने निर्मित केलेल्या सर्व प्रकारच्या सामानावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जातेय. त्यातच आता भारत-चीन सीमेवरील या दोन देशांमधील वाढता संघर्ष लक्षात घेता मोबाईल फोनमधून चीनने बनवलेल्या अॅप्सला अनइन्स्टॉल करण्याचे प्रमाण वाढत आहे. एवढेच नव्हे तर मुळात चीनच्या असलेल्या टिकटॉक अॅपवरही नेटिझन्स यांनी चीनविरोधात भावना व्यक्त करणारे व्हिडिओ व पोस्ट शेअर केल्या आहेत.
चीन हा आपल्या देशाच्या शत्रूला मदत करीत आहे, हा एक विषय आहे. पण, त्यापेक्षा भीषण म्हणजे, या चिनी वस्तूंमुळे येथील पारंपरिक व्यापार संकटात आला आहे. त्याचे दुष्परिणाम येथील किरकोळ व्यावसायावर होत आहेत. चिनी वस्तूंना मागणी कमी झाल्यास स्वदेशी मालाची विक्री वाढेल, परिणामी देशात रोजगार निर्मिती वाढेल.
-विजय पुकाळे,
व्यावसायिक, नवीपेठ.