भय्या चौकातील नवा पूल होण्यास उशीर लागणार; विद्युतीकरणाच्या कामासाठी ४ इंच ट्रॅक खाली घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 12:22 PM2021-05-19T12:22:42+5:302021-05-19T12:22:48+5:30
रेल विकास निगमची नवी शक्कल-पुलाखालून विजेवरील रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा
सोलापूर : विद्युतीकरणाला अडथळा ठरणाऱ्या सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर असलेल्या भय्या चौकातील पुलाची अडचण दूर करण्यात आली आहे. रेल विकास निगम (आरव्हीएनएल) ने नवी शक्कल लढवून रेल्वे ट्रॅक ४ इंच खाली घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या पुलाखालून विजेवरील रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ट्रॅक खाली घेण्याच्या कामास सुरुवात झाली असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दुहेरीकरणाचे व विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू आहे. दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वास येत असून विद्युतीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. विद्युतीकरणाला अडथळा ठरणारा भय्या चौकातील उड्डाणपूल अडथळा ठरत असल्याने तो नव्याने बांधवा यासाठी रेल विकास निगम व रेल्वे प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र व्यवहार केला. मात्र, त्या पत्राचा लवकर विचार होत नसल्याने रेल विकास निगमने नवी शक्कल लढवीत विद्युतीकरणाला अडथळा ठरणारी पुलाचा विषय बाजूला ठेवत रेल्वे ट्रॅकच खाली घेऊन त्यावरून विजेवरील धावण्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
----------------
२० दिवसांत होणार काम पूर्ण
रेल्वे ट्रॅक खाली घेण्याच्या कामास १५ मेपासून सुरुवात करण्यात आली आहे. ४ इंच ट्रॅक खाली घेण्यात येणार आहे. नियमित ३० ते ४० कर्मचारी ट्रॅक घेण्याचे काम करीत आहेत. २० दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच या पुलाखालून विजेवरील रेल्वे धावणार असल्याचे रेल विकास निगम (आरव्हीएनएल) सांगितले.
-------------
विद्युतीकरणाचे ९० टक्के काम पूर्ण
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. दौंड ते सोलापूर या मार्गावर सध्या सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात काम सुरू आहे. पोल उभारणे, वायरिंग करणे, तारा ओढण्याचे काम वेगात सुरू आहे.
भय्या चौकातील पुलाचा अडथळा दूर झाला आहे. ४ इंच ट्रॅक खाली घेण्याच्या कामास आम्ही सुरुवात केलेली आहे. २० दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रेल्वे विद्युतीकरणाच्या कामात स्थानिक नागरिकांनी रेल्वे विभागाला सहकार्य करावे, शेवटी विकास तुमच्या शहराचा होणार आहे.
- ए. के. ढोंबे,
वरिष्ठ अधिकारी, रेल विकास निगम लिमिटेड, पुणे