जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश; लस न घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी-शासकीय कार्यालयात "नो एन्ट्री"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 12:53 PM2022-01-10T12:53:45+5:302022-01-10T12:53:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत गरजेचे आहे. लसीचे दोन्ही घेणाऱ्या नागरिकांनाच शासकीय कार्यालये व इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांची हीसीद्वारे आढावा बैठक घेतली. या प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, लसीकरण मोहिमेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, नगरपालिकेचे जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
लसीकरण कमी झालेल्या तालुकास्तरीय यंत्रणांनी त्यांच्या तालुक्यात शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी प्राधान्याने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी देऊन पोलीस विभागानेही रस्त्यावर उतरून कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
ऊसतोड कामगारांना लस बंधनकारक
जिल्ह्यातील सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यातील ऊस तोड कामगार तसेच कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे १००% लसीकरण होण्यासाठी संबंधित कारखान्याने त्या-त्या तालुक्यातील तालुकास्तरीय यंत्रणेशी समन्वय ठेवून एक लसीकरण टीम उपलब्ध करून घ्यावी. यासाठी साखर सहसंचालकांनी साखर कारखाने व प्रशासन यात समन्वयक म्हणून भूमिका पार पाडावी व लसीकरण करून घ्यावे अशी सूचना शंभरकर यांनी केली.
कृषी बाजार समित्यांमध्ये प्रवेश देऊ नका
जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसात कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ नये, यासाठी शासकीय कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर सार्वजनिक अस्थापना बरोबरच पेट्रोल पंप, मंगल कार्यालये व गर्दी होणाऱ्या सर्व खाजगी ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांनाच प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले.