सोलापुरातील नवी संकल्पना; आरे व्वा, वहीच्या रूपांत चक्क लग्नपत्रिका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 10:39 AM2021-11-25T10:39:47+5:302021-11-25T10:39:53+5:30
नवीन संकल्पना : मुलांना अभ्यासासाठी पत्रिकेचा होणार वापर
सोलापूर : लग्न म्हटलं की पत्रिका आलीच. मात्र, लग्न झाले की पत्रिकांचे करायचे काय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. आजकाल विविध आकर्षक पत्रिका छापण्याचा ट्रेंड सुरू आहे. तोच विचार करत भन्नाट कल्पना घेऊन सोलापुरातील दामा कुटुंबीयांनी वहीच्या रूपांत चक्क लग्नपत्रिका तयार केलेली संकल्पना नागरिकांना आवडली आहे.
काळ बदलत असला तरी अद्यापही लग्नपत्रिकांची छपाई मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. कारण, लग्नपत्रिका मिळाल्याशिवाय लग्नाला येणार नाही, हे मानापमान अजूनही दिसून येतात. मात्र, आता लग्नपत्रिकांचा ट्रेंडही बदलत आहे. जसे दामा कुटुंबीयांची मुलगी पेशाने अभियंता असल्याने ते वहीच्या स्वरूपात पत्रिका देत आहेत. ३० नोव्हेंबरला सिद्धेश्वर दामा यांची मुलगी वैष्णवीचा विवाह आहे. साधारण एखादी पत्रिका तयार करण्यासाठी वीस ते पंचवीस दिवस लागतात. मात्र, या वहीची एक लग्नपत्रिका ४० रुपयांमध्ये तयार करण्यात आलेली आहे.
---
अशी आहे वहीच्या रूपात पत्रिका
लग्नात ज्याप्रमाणे पत्रिका बनवली जाते, त्याचप्रमाणे वहीची पत्रिका बनवली आहे. लग्न झाल्यानंतर पत्रिका फेकून न देता ती आपल्या मुलांना अभ्यासासाठी देऊ शकतो, अशा ४०० पत्रिका त्यांनी बनवल्या आहेत. वहीच्या पुढील कव्हरवर नवरा - नवरीचा परिचय आणि कौटुंबिक माहिती तर पाठीमागील कव्हरवर विवाहस्थळ, वधू आणि वराचा फोटो छापलेला आहे.
---
लग्नपत्रिका देखील डिजिटल
सध्या मित्रांना, स्वकियांना सोशल साइट्सद्वारे लग्नाची पत्रिका पाठवत असतो. त्यात तो फेसबुकचा वापर करून लग्नाचा इव्हेंट करतो, तर कोणी व्हॉट्सॲपच्या माध्यमाने शॉर्ट जेपीजी इमेज तयार करून सर्वांना पाठवतो. यामुळे कमी वेळात आणि कमी खर्चात आपली लग्नाची पत्रिका पोहचविता येते. त्यामुळेच हा डिजिटल लग्नपत्रिकांचा बदलता ट्रेंड सर्रास वापरला जात आहे.
----
आमच्या मुलीचे लग्न ठरल्यापासूनच आम्ही लग्नपत्रिका काशी करायची याचा विचार करत होतो. आम्ही सगळ्यांनी मिळून नवीन पद्धतीने पत्रिका करावी, असा विचार केला. त्यातूनच आम्हाला वहीची पत्रिका प्रिंट करायची कल्पना सुचली. वेगळे काय करता येईल, या हेतूने आम्ही आगळी-वेगळी पत्रिका बनवली आहे.
- सिद्धेश्वर दामा