उसावरील तांबड्या अन् लोकरी माव्याचं नवं संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:23 AM2021-07-29T04:23:04+5:302021-07-29T04:23:04+5:30
पंढरपूर : शेतकरी एकीकडे संकटात असताना आता नव्यानं ऊसावरील तांबड्या अन् लोकरी माव्याचं संकट शेतकऱ्यांपुढे उभे टाकले आहे. यामुळे ...
पंढरपूर : शेतकरी एकीकडे संकटात असताना आता नव्यानं ऊसावरील तांबड्या अन् लोकरी माव्याचं संकट शेतकऱ्यांपुढे उभे टाकले आहे. यामुळे ऊसाचे हजारो एकर क्षेत्र उद्धवस्त होत आहे.
दीड वर्षांपासून कोरोना महामारी व सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाचा दर्जा चांगला असूनही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खात्रीचा हमीभाव असलेल्या ऊस या पिकावर सलग तिसऱ्या वर्षी महापुराची टांगती तलवार कायम आहे. तर दुसरीकडे सर्रास ठिकाणी उसावर तांबड्या व लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हजारो एकर उसाचे प्लॉट रातोरात उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पंढरपूर तालुका हा साखर पट्टा म्हणून जिल्ह्यात परिचित आहे.
पंढरपूर तालुक्यात प्रमुख व खात्रीचा हमीभाव देणारे पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. पंढरपूर तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा, माण नद्या, तर उजनीचा डावा व उजवा कालवा तसेच निरा उजवा कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे पंढरपूर तालुक्यात ऊस शेती मोठ्या प्रमाणात बहरली आहे. उसाचे वाढते क्षेत्र असल्याने ऊस बेणे, जनावरांना चारा याकरिता देखील उसाचा वापर केला जात आहे. ऊस शेती शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे.
-----
लोकरी माव्याचा वाढता प्रादुर्भाव
उसाच्या बाहेरच्या बाजूला लोकरी मावा आला असेल तरच शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडतो. लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झालेल्या उसाच्या पानाच्या पात्यावर पांढरे डाग दिसून येतात. हेच डाग वाढत जाऊन काळे पडतात. उसाची पाने देखील काळी पडतात व करपून जातात. पानाबरोबर ऊस देखील वाळत असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे खात्रीचा हमीभाव असलेल्या ऊस शेतीला घरघर लागली आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
---
कारखानदार, कृषी विभागाने लक्ष घालावे...
ऊस लागवडीनंतर अनेक कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या नोंदी घेतल्या जातात. त्याप्रमाणे त्यांना जास्त उत्पादन मिळवण्यासाठी मार्गदर्शन खते, औषध ही पुरविली जातात. यामध्ये कृषी विभाग ही असतो. आता उसावर तांबड्या व लोकरी माव्याचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. यातून ऊस शेती वाचविण्यासाठी सहकारी साखर कारखाने, कृषी विभाग यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, करून मदत करावी अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
---