राष्ट्रवादीत नव्या घडामोडी; सोलापूरच्या ‘पिच’वर रोहित पवारांची ‘बॅटिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 12:32 PM2021-01-22T12:32:02+5:302021-01-22T12:32:12+5:30
विविध समाज घटकांशी साधला संवाद
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचे सोलापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम असल्याचे सांगितले जाते. थोरल्या पवारांचे नातू, कर्जतचे आमदार रोहित पवार यांनीही सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय खेळपट्टीवर बॅटिंगला सुरुवात केली आहे. एका साध्या कार्यक्रमासाठी सोलापुरात आलेल्या रोहित पवारांनी गेल्या दोन दिवसांत पार्क चौपाटीवरची भेळ खाण्यापासून विविध समाजघटकांमध्ये रमण्याचा प्रयत्न केला.
सोलापूरचा पालकमंत्री आपलाच असावा असा शरद पवार यांचा प्रयत्न असतो. महाआघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी दिलीप वळसे-पाटील यांना पालकमंत्रिपदी नेमले. प्रकृतीच्या अडचणीमुळे वळसे-पाटील बाजूला झाले. त्यांची जागी मानसपुत्र तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना नेमले. आव्हाड यांना कोरोनाने घेरल्यानंतर अजितदादांचे खास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री झाले. यानंतर मात्र थोरल्या पवारांचे लाडके रोहित पवार जिल्ह्यात फिरू लागल्याचे अनेकांच्या लक्षात येत आहे. पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने रोहित पवारांनी सोलापुरात बराच वेळ दिला.
बुधवारी सायंकाळी ते पुन्हा सोलापुरात आले. शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह इतर तरुण कार्यकर्त्यांसोबत त्यांनी मनोहर सपाटे अध्यक्ष असलेली पार्क चौपाटी गाठली. पवारांना कदाचित चौपाटीवर अपेक्षित असलेले सेल्फी कार्यक्रम अगदी जुळून आले. दुसऱ्या दिवशी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे त्यांच्या दौऱ्यात सहभागी झाले. रोहित पवारांनी गुरुवारी हौशी मित्रांसोबत क्रिकेटचा आनंद लुटला. पार्क स्टेडियमची पाहणी केली. मिलिंद विहार, सिद्धेश्वर मंदिर, शाहजूर दर्गाह, मार्कंडेय मंदिरात भेट देताना या भागांतील देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष महेश कोठे यांच्यासह इतर समाजबांधव आलेत की नाही यावरही लक्ष ठेवले. सोलापूर विद्यापीठात जाऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी निधी मिळवून देऊ, असा शब्द दिला. सोलापुरातून जाताना अरणला संत सावता माळी यांचेही दर्शन घेतले.
चर्चा तर होणारच...
सोलापुरात शरद पवारांचा गट आधीपासूनच कार्यरत आहे. अलीकडे अजित पवारांनी जिल्ह्यात जम बसविला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आरती हुळ्ळे, श्रेया भोसले व इतर तरुणी संघटन करीत आहेत. त्यातच आता रोहित पवारांचे दौरे सुरू झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चा तर होणारच.