नवलच; घागर, हंडा, कळशी अन् डबा वाजवित झाला ढोलकीवादक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 02:49 PM2020-02-17T14:49:14+5:302020-02-17T14:52:12+5:30
निळू फुलेंच्या शाबासकीने मिळाली प्रेरणा; माढ्यातील तरुणाची अशीही कहाणी
माढा : घरात सहज बसल्या-बसल्या घागर, हंडा, कळशी अन् जेवणाचा डबा वाजविण्याची सवय होती़ मात्र तीच सवय पुढे कला बनली अन् एक ढोलकीवादक म्हणून नावलौकिक मिळाला़ विशेषत: अभिनेता निळू फुले यांच्या शाबासकीने तर प्रेरणाच मिळाली़ ही कहाणी आहे माढ्यातील तरुण कलाकार नीलेश देवकुळे यांची.
आई माढा नगरपंचायतीमध्ये सफाई कामगार तर वडील होमगार्ड म्हणून काम करतात़ परिस्थिती तशी हलाखीचीच त्यामुळे जीवनात कोणत्याही संगीताचा क्लास लावला नाही, ना कुणी संगीताचे धडे दिले.
काहीही शिकायचं म्हटलं तर त्यांना गुरु हा असावाच लागतो़ पण संगीतातील गुरु नीलेशला मिळालाच नाही़ लहानपणापासून नीलेशला ढोलकी वाजवण्याची आवड होती, पण त्याच्याकडे ती नव्हती. त्यामुळे तो घरातील घागर, हंडा, कळशी, जेवणाचा डब्बा यावर थाप मारून ढोलकी वाजविण्याची कला आत्मसात केली़ त्यानंतर या उपजत कलेच्या माध्यमातून ढोलकी वाजवू लागलो, असे ते सांगत होते़
महाराष्ट्रात ढोलकीवादनाची कला जपणारे अनेक कलाकार आहेत. त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे़ या कलाकारांना व्यासपीठ न मिळाल्याने पारंपरिक वाद्ये लोप पावत आहेत़ कलाकार जगला तर कला टिकणार आहे, असे ढोलकीवादक नीलेश देवकुळे म्हणाले.
असा झाला सन्मान
नीलेश देवकुळे यांनी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर झालेल्या ‘ढोलकी झाली बोलकी’ या कार्यक्रमात त्यांनी ढोलकी वादन केले़ त्यात तो विजेता ठरला़ तसेच महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाला़ टेंभुर्णी फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव, पिंपरी चिंचवडमध्ये बालकलाकार यांसह अन्य पुरस्कार मिळालेले आहेत़ नीलेश परिवारात मामा, आई, आजी यांना ढोलकीची आवड होती़ तोच वारसा त्यांनी आजपर्यंत जपला असल्याचे दिसून येते़