‘या’ जिल्ह्यात होणार नवीन इंजीनिअरिंग कॉलेज सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 10:34 AM2020-03-07T10:34:07+5:302020-03-07T10:37:10+5:30
मुंबईत झाली बैठक: उच्च व तंत्रशिक्षण मत्र्यांनी दिले संकेत
सोलापूर : सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन बंद न करता याच इमारतीच्या आवारात नवीन अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्यात येईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबईतील बैठकीत दिली.
सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतनसंदर्भात आमदार प्रणीती शिंदे यांनी लक्ष वेधले होते. त्यावर मुंंबईत मंत्रालयात गुरूवारी बैठक झाली. या बैठकीला आमदार प्रणिती शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरव विजय, सहसंचालक प्रमोद नाईक, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. चितळांगे, वैभव शेलवाले, वैभव ख्याडे, माधव नरसाने, शुभम नालवाडे, अनिकेत वाकुडे उपस्थित होते.
शासनाने २0१५ मध्ये सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेताना तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम हा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे ठरविले होते. हा निर्णय चुकीचा व गरीब विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असून शासकीय तंत्रनिकेतन बंद करू नये अशी मागणी विविध संघटना व पालकांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती. शासकीय तंत्रनिकेतनमधील पदविका अभ्यासक्रम बंद केला गेला असता तर गरीब व हुशार विद्यार्थ्यांना खासगी तंत्रनिकेतनमध्ये मोठे शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागला असता याकडे आमदार शिंदे यांनी लक्ष वेधले.
तंत्रनिकेतनमध्येच अभियांत्रिकी कॉलेज
सोलापुरात शासकीय तंत्रनिकेतन सन १९५६ पासून सुरू आहे. तंत्रनिकेन ३२ एकरात वसले आहे. या ठिकाणी स्थापत्य, संगणक, विद्युत, अणुविद्युत व दूरसंचारण, यंत्र, माहिती तंत्रज्ञान व वस्त्रनिर्माण असे पदविका अभ्यासक्रम सुरु आहेत. या ठिकाणी वस्त्रोद्योगचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम सुरूच ठेवण्यात येईल व नवीन शैक्षणिक वषार्पासून तंत्रनिकेतनच्या आवारातच अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी संबंधीत अधिकाºयांना दिल्या.