सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नवा प्रयोग, ज्वारीपासून बनणार पास्ता, बिस्कीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 12:40 PM2021-09-07T12:40:01+5:302021-09-07T12:40:17+5:30
आत्मनिर्भर अन्न प्रक्रिया योजना: १२१ शेतकऱ्यांनी केला कृषी विभागाकडे अर्ज
राजकुमार सारोळे
सोलापूर : ज्वारीपासून आत्तापर्यंत कडक भाकरी, कुरवड्या, पापड बनविले जात होते. पण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता नवे मार्केटिंग आत्मसात केले असून, केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेतून कर्ज घेऊन बिस्किट, पास्ता, रवा बनविण्याचे कारखाने शेतात उभारण्याची तयारी केली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील १२१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना आणली आहे. सोलापूर जिल्हा रब्बी ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत ज्वारीवर प्रक्रिया उद्योग उभारणीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ज्वारीवर प्राथमिक, दुय्यम प्रक्रिया करून अन्न उद्योग उभारू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना प्रकल्प रकमेच्या ३५ टक्के किंवा जास्तीतजास्त १० लाख अनुदान दिले जाणार आहे. माढा, बार्शी, करमाळा तालुक्यातून सर्वाधिक अर्ज आले आहेत असे कृषी विभागातील प्रकल्प समन्वयक एम. ए. पठाण यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी अर्ज करताना कोणता उद्योग उभारणार याचा प्रकल्प अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. पण बऱ्याच शेतकऱ्यांनी नुसतेच अर्ज केले आहेत. अशा शेतकऱ्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रकल्प सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्वारीपासून नवीन कोणते पदार्थ बनविता येतील याची वेबसाईटवर माहिती घेतली व पास्ता बनविण्याचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे मंगळवेढ्याचे शेतकरी मयूर भोसले यांनी सांगितले. माढा व करमाळ्यातील शेतकऱ्यांनी बिस्किट, रवा, पापड, कुरवड्या बनविण्याचे प्रस्ताव दिले आहेत.
तालुकानिहाय उद्दिष्ट...
- उत्तर सोलापूर: १०
- दक्षिण सोलापूर: १०
- मोहोळ: १०
- अक्कलकोट: १०
- पंढरपूर: १०
- माळशिरस: १०
- मंगळवेढा:१०
- सांगोला: १०
- माढा: ५०
- करमाळा: १५
कोणाला घेता येणार लाभ?
ज्वारीवर प्रक्रिया उद्योग उभारू इच्छिणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्यास कृषी विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येईल. त्याचबरोबर कंपनी, गटशेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी भागिदारी किंवा भाड्याची जागा असेल तर तसा करार जोडणे अपेक्षित आहे. उद्योगास कर्ज देऊ इच्छिणाऱ्या बँका अर्जदारानेच निवडायच्या आहेत. कृषी विभाग फक्त अनुदानासाठी प्रकल्प शिफारस करेल. असा करा अर्ज
०कृषी विभागाच्या पीएमएफएमई या वेबसाईटवर जाऊन अर्ज ओपन करायचा आहे. या अर्जात नावासह सर्व माहिती अचूक भरायची आहे. सोबत सात बारा, आधार, पॅनकार्ड, प्रकल्प अहवाल जोडायचे आहेत.
०अर्जासोबत प्रकल्प अहवाल अपलोड नसेल तरी अर्ज सबमिट होतो. कृषी विभाग याची नोंद घेऊन संबंधित शेतकऱ्यास प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मदत करतो. उद्योग, जागा, मशिनरी, बँक या गोष्टी शेतकऱ्यांनेच निवडायच्या आहेत.
आत्मनिर्भर भारत अंतर्गत सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेत सोलापूर जिल्ह्यासाठी ज्वारीची निवड झाली आहे. ज्वारीवर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी १२१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अजूनही शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. १५ शेतकऱ्यांचे उद्योग निवडले असून, त्यांना तातडीने कर्ज देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेतली जाणार आहे.
- बाळासाहेब शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी