सोलापुरातील शिस्त अन् पोलिसिंग दाखविणार नवे फौजदार उपराजधानीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 01:04 PM2020-10-27T13:04:42+5:302020-10-27T13:06:48+5:30
अकरा फौजदारांचा केला निर्धार; पोलीस आयुक्तालयाचा निरोप घेताना गहिवरले
सोलापूर : अनेक वर्षे शहर पोलीस दलात काम केले. इथून लागलेली शिस्त अन् सोलापुरी पोलिसिंग उपराजधानी नागपुरी दाखविण्याची संधी आहे. या संधीचं सोनं करून सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे नाव नागपुरी जनतेच्या हृदयात उमटवू, असा जणू निर्धार नव्याने फौजदार झालेल्यांनी कार्यक्रमस्थळी केला. सोमवारी सकाळी पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाºयांचा निरोप घेताना हे फौजदार गहिवरले होते.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या ११ फौजदारांना शुभेच्छा देताना काही टिप्सही दिल्या. घरापासून दूर जात असला तरी तेथे प्रामाणिकपणाने ड्यूटी बजावा. सोलापूरचे नाव रोशन करा, असा सल्लाही त्यांनी दिला. निरोप मिळालेले अकरा फौजदार लवकरच उपराजधानीत दाखल होणार आहेत.
निरोप समारंभावेळी पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त वैशाली दरेकर, सहायक पोलीस आयुक्त कमलाकर ताकवले, वेल्फेअरचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे आदी अधिकारी उपस्थित होते.
पोलीस खात्यांतर्गत फौजदार परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्यांचा पोलीस महासंचालक कार्यालयाकडून त्यांना बढतीही देण्यात आली. काही जण कोकणात जाणार तर एक जण अमरावतीला. महामार्ग पोलीस दलात दोन तर ११ जण नागपूरला जाण्यासाठी सज्ज होत आहेत.
या पोलिसांची झाली नागपुरात नियुक्ती...
पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार अविनाश घोडके, नंदकिशोर कवडे, विजयकुमार लट्टे, प्रकाश खडतरे, हनुमंतराव बादोले, हेमंत काटे, शिवपुत्र हरवलकर, श्रीकांत जाधव, योगीराज गायकवाड, माधव धायगुडे, सूरज मुलाणी, सतीश भोईटे, नीलकंठ तोटदार, बाळासाहेब उन्हाळे, नरसप्पा राठोड, प्रकाश किणगी, सरताज शेख, राजकुमार परदेशी, नागनाथ कानडे, प्रभाकर पात्रे यांना फौजदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. यातील नऊ जणांना शहरांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.