नवे उद्योग, विमानसेवा केव्हा येणार सोलापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 04:05 PM2019-04-12T16:05:37+5:302019-04-12T16:09:11+5:30

जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयाचा ‘लोकमत’ने घेतलेला आढावा; तज्ज्ञ म्हणतात, शहर धुमसतंय, जागे व्हा

New industry, when the airline comes to Solapur | नवे उद्योग, विमानसेवा केव्हा येणार सोलापुरात

नवे उद्योग, विमानसेवा केव्हा येणार सोलापुरात

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील शेकडो मुले रोजगारासाठी पुणे, मुंबईत, हैदराबादेत स्थायिक झालीपुण्यात तर पुणेरी सोलापूर ही संघटना तयार होत आहे सोलापुरातून दरवर्षी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी या शहरात नवे उद्योग यायला हवेत

राकेश कदम 

सोलापूर : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून शहरात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. पण शहर आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासाचे नियोजन अद्याप झालेले नाही. जिल्ह्यातून दरवर्षी हजारो गुणवान तरुण-तरुणी पुण्याला स्थलांतरित होत आहेत.  आयटी पार्क, टेक्स्टाईल पार्क, विडी उद्योग आणि साखर कारखान्यातील कंत्राटी कामगारांची अडचण हे विषय गंभीर होत असले तरी निवडणुकीच्या प्रचारात या मुद्यांना दुय्यम स्थान मिळत आहे. त्यावर सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे. 
पाणी ही जिल्ह्याच्या आणि शहराची प्रमुख गंभीर समस्या आहे. उजनी धरणावरचा ताण वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार उजनी धरणातील पाणी कमी पडणार आहे. 

कृष्णा खोºयातील अतिरिक्त पाणी उजनी धरणात वळवू. केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी नाही. यंत्रमाग उद्योग अडचणीत असल्याने कामगारांवर टांगती तलवार आहे. 

केंद्राच्या नव्या धोरणामुळे विडी कामगारांवर कोणत्याही क्षणी गंडांतर येऊ शकते. शहरात मंजूर झालेल्या टेक्स्टाईल पार्कचे काय झाले, नवे पार्क कधी येणार? याची फारशी चर्चा प्रचारात नाही. रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.
 मागील काळात यासाठी काय प्रयत्न झाले आणि पुढील काळात आम्ही काय करु याचाही ऊहापोह व्हायला हवा.

 लोकसभेची निवडणूक लढविणाºया काही उमेदवारांना येथील मूळ प्रश्न माहीत नाही. देव, धर्म, कथित राष्ट्रभक्ती यावरच प्रचाराचा जोर आहे. उद्या निवडणूक संपल्यानंतर धर्म-राष्ट्रभक्ती नव्हे तर पाणी आणि रोजगाराचा विषय महत्त्वाचा असेल. 

तज्ज्ञ म्हणतात...
राजकीय नेत्यांनी नव्या उद्योगांबरोबरच  बार्टी, यशदा सारख्या प्रशिक्षण संस्था सोलापुरात याव्यात. सोलापूरसाठी स्वतंत्र खंडपीठ व्हावे, वर्किंग वूमनसाठी शेल्टर्स सुरू व्हावेत, उजनी धरणाचे प्रदूषण कमी व्हावे या मुद्द्यांवर बोलायला हवे. पाणी ही गंभीर समस्या आहे. पण धर्माच्या प्रचारात ती बाजूलाच ठेवली. 
- अ‍ॅड़ सरोजनी तमशेट्टी, विधी सल्लागार, सूर्यतारा म.ब. विकास सं. 

सोलापूरची परिस्थिती समजून घेऊनच निवडणुकीचा प्रचार व्हायला हवा. केवळ तरुणच नव्हे तर कष्टकरी माणसेही आता स्थलांतरित होत आहेत. टेक्स्टाईल पार्कविषयी खूप बोलले गेले.पण त्याविषयी काही झाले नाही. अशा विविध मुद्द्यांचा ऊहापोह निवडणुकीच्या प्रचारात व्हायला हवा. त्याऐवजी वेगळ्याच मुद्द्यांवर प्रचार सुरू आहे.
- प्रा. विलास बेत, सामाजिक कार्यकर्ते.

आतापर्यंत काय झाले उपाय?
1 सोलापूर- पुणे चौपदरीकरण झाले. पण सोलापूर-हैदराबाद रस्त्याचे चौपदरीकरण खूपच संथगतीने सुरू आहे. सोलापूर-कोल्हापूर, सोलापूर-विजापूर चौपदरीकरणाच्या कामातही अपेक्षित गती दिसत नाही.    
2 उजनीमुळे जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढली. पण केंद्र सरकारच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत आला. हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक अडचणीत आली. 
3 २००४ पासून आतापर्यंत शहरात नवे उद्योग आणण्याच्या बाता मारण्यात आल्या. प्रत्यक्षात त्यादृष्टीने विशेष हालचाली झाल्या  नाहीत.  

तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?
1 सोलापुरातून दरवर्षी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी या शहरात नवे उद्योग यायला हवेत. सध्या कार्यरत असलेल्या उद्योगातील कामगारांचे शोषण थांबायला हवे.    
2 विडी उद्योग, यंत्रमाग, साखर कारखान्यातील हंगामी कामगारांसह कंत्राटी कामगारांच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण काम व्हायला हवे. या कामगारांच्या कुटुंबीयांसाठी स्वस्तात शिक्षण, आरोग्याच्या सुविधा मिळायला हव्यात. 
3 उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी, विमानसेवा हे विषय तातडीने मार्गी लागायला हवेत. 

पुणेरी सोलापूरकर !
शहरातील शेकडो मुले रोजगारासाठी पुणे, मुंबईत, हैदराबादेत स्थायिक झाली आहेत. पुण्यात तर पुणेरी सोलापूर ही संघटना तयार होत आहे. हे स्थलांतर बंद व्हायला हवे. 

Web Title: New industry, when the airline comes to Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.