नवा आदेश; कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र असेल तरच कर्नाटकात या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 03:59 PM2021-08-17T15:59:42+5:302021-08-17T15:59:48+5:30
कर्नाटक सरकारचे आदेश : कोरोना रोखण्यासाठी घेतला निर्णय
सोलापूर : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना त्यांची लसीकरणाची स्थिती विचारात न घेता ७२ तासांपेक्षा जुने नसलेले आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह अहवाल (रिपोर्ट) जवळ आता अनिवार्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना आता कर्नाटकात सहजासहजी प्रवेश मिळणार नाही.
कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरत असली, तरी रेल्वेची प्रवासी वाहतूक अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या असून, या गाड्यांमध्ये केवळ आरक्षित तिकिटांवरच प्रवास करता येतो. या गाड्यांमध्ये प्रवास करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आवश्यक आहे. आता कर्नाटक राज्याने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून ही एक उपाययोजना असल्याचे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.
----------