एकूण सभासदांची यादी तक्रारदारास देण्याचे नव्याने आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:23 AM2021-08-29T04:23:41+5:302021-08-29T04:23:41+5:30
सहकार शिरोमणी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाची तब्बल १९ कोटी ४९ लाख रुपये थकविल्याची तक्रार कारखान्याचे ...
सहकार शिरोमणी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाची तब्बल १९ कोटी ४९ लाख रुपये थकविल्याची तक्रार कारखान्याचे माजी संचालक दीपक पवार यांनी पुणे साखर आयुक्तांकडे केली होती. त्यावेळी साखर आयुक्तांनी कारखान्याची मालमत्ता विकून ऊस उत्पादक सभासदांना १५ टक्के व्याजासह रक्कम देण्याचे आदेश दिले होते.
शिवाय कारखान्याची आजअखेर असणारी एकूण सभासदांची यादी गेल्या पाच वर्षांत कमीजास्त केलेल्या सभासदांची स्वतंत्र यादी, शेअर्स अनामत रकमा जमा असणाऱ्या व्यक्तींची यादी व सीताराम साखर कारखान्याचे शेअर्स रक्कम, सभासदांची यादी ही देण्याचे आदेश साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी काढले होते. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. म्हणून माजी संचालक दीपक पवार यांनी पुन्हा साखर आयुक्तांकडे लेखी तक्रार करीत दाद मागितली आहे.
त्यावर प्रादेशिक सहसंचालक राजकुमार दराडे यांनी कारखान्याला पुन्हा नव्याने आदेश काढत दीपक पवार यांना सभासदांच्या याद्या देण्यात याव्यात, अन्यथा पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
आरआरसी कारवाईची अंमलबजावणी करावी
सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष व कारखाना प्रशासन जाणूनबुजून सभासदांच्या याद्या हेतुपुरस्सर दडवत असल्याचा आरोप केला आहे. सभासदांच्या यादीमध्ये त्यांनी आमच्या म्हणण्यानुसार काही फेरफार, गैरमार्गाने बदल केले नसल्यास ते जाहीर का करीत नाहीत, असा सवाल उपस्थित केला आहे. शिवाय प्रादेशिक साखर संचालकांनी कारखान्यावर आरआरसीची कारवाई करूनही त्याची अंमलबजाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. असे होत असेल तर आम्ही न्यायालयात दाद मागू अथवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करू, असा इशारा दीपक पवार यांनी दिला आहे.
कोट ::::::::::::::::
याबाबत साखर कारखान्याला दुसरे पत्र मिळाल्याचे आपल्या निदर्शनास आले नाही. मिळाले असल्यास याबाबत योग्य माहिती घेऊन साखर संचालकांना कळविण्यात येईल.
- कल्याणराव काळे
अध्यक्ष, सहकार शिरोमणी साखर कारखाना