मनपा आयुक्तांचा नवा आदेश; आता दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 01:28 PM2021-04-21T13:28:32+5:302021-04-21T13:28:36+5:30
कोरोनाशी लढा : मनपा आयुक्तांचे नवे आदेश
सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू राहतील असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी काढले. यातून मेडिकल व रुग्णालयांना वगळण्यात आले आहे.
राज्य सरकारने पुन्हा मोठ्या लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. दुकानांच्या वेळा कमी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी दुकाने वेळ सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश होते. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी त्यातही कपात केली. सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेतच दुकाने सुरू राहतील असे आदेश दिले होते. आता बुधवारपासून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवता येतील. यामध्ये सर्व किराणा दुकाने, भाजीपाला, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व प्रकारची खाद्य पदार्थांची दुकाने, चिकन, अंडी विक्रीची दुकाने, कृषी अवजारे आणि शेतातील उत्पादन, पाळीव प्राण्यांची खाद्य विक्रीची दुकाने आदींचा समावेश आहे.
होम डिलिव्हरीची मुभा
दुकानदारांना आपल्या मालाची होम डिलिव्हरी करता येईल. यासाठी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंतची मुभा असेल. सर्व रेस्टाॅरंट, बार, हॉटेल यांनाही होम डिलिव्हरीसाठी रात्री आठपर्यंतची मुभा असेल. हे आदेश १ मे पर्यंत लागू असणार आहेत.