सोलापुरातील रुग्णालयांचे नवे कारण; ऑडिटर नाही म्हणून डिस्चार्जही नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 01:19 PM2021-04-26T13:19:49+5:302021-04-26T13:19:54+5:30
कंट्रोल रुमला तक्रार केल्यानंतरच कोरोनामुक्तांना डिस्चार्ज
सोलापूर : कोरोनाबधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे काही रुग्णालयांमध्ये महापालिकेचा लेखापरीक्षक नसल्याचे कारण देऊन शनिवार आणि रविवारी डिस्चार्ज मिळत नसल्याचे अनुभव काही रुग्णांच्या नातेवाईकांना येत आहेत.
कोरोनामुळे सर्वच रुग्णालयांमध्ये बेड मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही नातेवाईकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. महापालिकेेने कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांचे बिल तपासणीसाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे. लेखापरीक्षकाने बिलाची तपासणी केल्यानंतरच रुग्णांना डिस्चार्ज दिला जातो. पालिकेच्या नियंत्रण कक्षातही याची माहिती कळविली जाते. होटगी रोड मोहिते नगर भागातील एका रुग्णालयात दोन ज्येष्ठ नागरिक उपचार घेत होते. यातील एका ज्येष्ठ महिलेने कोरोनावर मात केली. शुक्रवारी त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे डिस्चार्ज घेण्यासाठी शनिवारी नातेवाईक धडपडत होते.
महापालिकेचे ऑडिट सुटीवर आहे. त्यामुळे डिस्चार्ज मिळणार नाही असे नातेवाईकांना सांगण्यात आले. ऑडिटर नसेल तर आम्ही दोन दिवसांचा खर्च का भरायचा असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला. त्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही. आमच्या रुग्णालयातील कर्मचारी रविवारी सुटीवर असतात. त्यामुळे डिस्चार्ज मिळणार नाही, असे उत्तर नातेवाईकांना देण्यात आले. अखेर नातेवाईकांनी पालिकेच्या कंट्रोल रुमला फोन केला. कंट्रोल रुममधील कर्मचाऱ्यांनी असे कोणतेही कारण रुग्णालयाला देता येणार नाही. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डिस्चार्ज घ्या, असे सांगितले. पुन्हा रुग्णालयात वाद घातल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
असाही एक अनुभव
सात रस्ता, जिल्हा परिषद भागातील दोन नामवंत रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना शनिवारी असाच अनुभव आला. या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रमुखांना फोन केले. त्यावर डॉक्टरांनी नातेवाईकांना बरे-वाईट सुनावले. एकतर आम्ही तुम्हाला बेड देतो. वरुन तुम्ही डिस्चार्जसाठी तक्रार करता का?, असेही या नातेवाईकांना सांगण्यात आले.