सोलापुरात आढळली ‘टॅरांटूला’ कोळ्याची नवीन प्रजाती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:36 PM2020-09-29T12:36:24+5:302020-09-29T12:38:35+5:30
पाच वर्षांचा अभ्यास : भारतीय वन्यजीव संस्थेने केले संशोधन
सोलापूर : डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून झालेल्या संशोधनात सोलापुरातील माळरानावर ‘टॅरांटूला’ या कोळ्याच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. या नव्या प्रजातीचे नाव आयडीओप्स वानखेडे असे ठेवण्यात आले आहे. भारतीय वन्यजीव संस्थेचे मागील पाच वर्षांपासून देशभरात कोळी किड्याविषयी संशोधन सुरु होते. या संशोधनात सोलापुरातही एका वेगळ्या कोळीचा शोध लावण्यात तज्ज्ञांना यश आले आहे. या संशोधनाला पाच वर्षांचा अवधी लागला.
सोलापुरात संशोधन करण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेचे पथक २०१५ मध्ये सोलापुरात आले होते. मानद वन्यजीव रक्षक डॉ. निनाद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. राजशेखर हिप्परगी, प्रसाद बोलदे, श्रीपाद मंथेन यांचा या संशोधनात महत्त्वाचा वाटा आहे. बोरामणी, तुळजापूरपर्यंतचे माळरान, अक्कलकोट रोड, विजापूर रोड, सिद्धेश्वर वनविहार येथे संशोधनासाठी सर्वेक्षण करण्यात आले. सोलापुरात माळरान असल्यामुळे संशोधनासाठी सोलापुरला महत्त्व देण्यात आले. सोलापुरात सापडलेल्या टॅरांटूला (ट्रॅप डोअर स्पायडर) या कुटुंबातील ह्यआयडीओप्स वानखेडेह्ण हा कोळी माळरानावर सापळा (जाळे) लावतो. जाळ्यामध्ये दुसरा कुठला जीव अडकतो का, याची वाट पहातो. एखादा किडा जाळीला स्पर्श केला की हा कोळी तिथे जाऊन त्याला खातो. हा कोळी शेतकºयांसाठी फायद्याचा असून, झाडाच्या मुळांना लागणाºया किड्यांना खातो.
प्रजातीस आयडीओप्स वानखेडे नाव का?
अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठात प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख असलेले डॉ. गणेश वानखेडे यांनी काम केले होते. अभ्यास व संशोधनासाठी त्यांनी कोळी हा विषय निवडला. त्यांनी देशभर फिरून कोळ्यांच्या सहाशे प्रजाती शोधून काढल्या. सोलापुरातील डॉ. राजशेखर हिप्परगी यांना डॉ. वानखेडे यांनी मार्गदर्शन केले होते. कोळीच्या संशोधनासाठी ते सोलापुरात येऊन गेले होते. म्हणून नव्याने सापडलेल्या या प्रजातीस आयडीओप्स वानखेडे नाव देण्यात आले.
बोरामणीच्या मोठ्या परिसरात पक्षी अणि प्राणी जसे की माळढोक, तणमोर लांडगा, कोल्हा, खोकड, काळवीट असे अनेक प्राणी आणि पक्षी आहेत. म्हणून बोरामणीसारख्या जागा वाचविण्याची नितांत गरज आहे. माळरान म्हणजे पडिक जमीन असा अनेकांचा समज आहे. पण, जंगलाइतकेच माळरानाचंही महत्त्व आहे.
- डॉ. राजशेखर हिप्परगी,
संशोधक, सोलापूर