POSITIVE 2020; चिंचोळी एमआयडीसीमध्ये नव्या वर्षात ‘एसटी’ची नवी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 02:50 PM2020-01-01T14:50:51+5:302020-01-01T14:54:03+5:30
पंढरपूरला नवीन एसटी स्थानक मिळणार; सोलापूर विभाग उत्पन्नाच्या दृष्टीने राज्यात अव्वलस्थानी
रुपेश हेळवे
सोलापूर: उत्पन्नाच्या दृष्टीने सरते वर्ष हे राज्य परिवहन महामंडळ, सोलापूर विभागाला खूप चांगले गेले़ अनेक वेळा उत्पन्नाच्या दृष्टीने राज्यात अव्वलस्थानी राहिले़ येणारे वर्षही एसटीसाठी चांगले असणार आहे़ येणाºया वर्षभरात एसटीची विभागीय कार्यशाळा चिंचोळी एमआयडीसी येथे हलवण्यात येणार आहे़ याचबरोबर पंढरपूरला नवीन एसटी स्थानक मिळणार आहे़ तसेच जुन्या स्थानकात काँक्रिटीकरणाचे काम पूर्णत्वाक डे जाणार आहे.
राज्य परिवहन महामंडळ, सोलापूर विभागाची विभागीय कार्यशाळा ही सोलापूर एसटी स्थानक परिसरातून चिंचोळी एमआयडीसी परिसरामध्ये हलवण्यात येणार आहे़ चिंचोळी एमआयडीसी परिसरामध्ये २७ एकर परिसरामध्ये अद्ययावत अशी नवीन विभागीय कार्यशाळा बांधण्यात येत आहे़ या कार्यशाळेचे बांधकाम नवीन वर्षाच्या एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत संपणार आहे़ यामुळे मे महिन्यादरम्यान ही कार्यशाळा चिंचोळी एमआयडीसी परिसरामध्ये हलवण्यात येईल़ येथे विभागीय भांडार आणि विभागीय कार्यशाळा असे दोन विभाग असणार आहेत़ याचबरोबर येथे एकाचवेळी अनेक गाड्यांची दुरुस्ती करण्याची व्यवस्था असणार आहे़ याचे काम एप्रिल २०१७ दरम्यान सुरू करण्यात आले होते.
राज्यभरातून पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठी एसटी प्रशासनाच्या वतीने जवळपास २६ एकर परिसरामध्ये नवीन एसटी स्थानक बनवण्यात येत आहे़ याचे काम या वर्षाखेरपर्यंत संपणार आहे़ या ठिकाणी दोन इमारती बांधण्यात येत आहेत़ यात एक यात्री निवास आणि एक बसस्थानक अशा दोन इमारती असणार आहेत.बसस्थानकात एकाच वेळी ३४ गाड्यांचे प्लॅटफॉर्म असणार आहे़ या कामाची सुरुवात जुलै २०१९ मध्ये झाली असून, हे काम नवीन वर्षाखेरपर्यंत पूर्ण होईल़ याचबरोबर या इमारतींना लिफ्टची सोय असणार आहे.
याचबरोबर जुन्या एसटी स्थानकात काँक्रिटीकरणाचे कामही सुरू झाले आहे़ यामुळे पावसाळ्यात पाणी थांबण्याची अडचण दूर होणार आहे़ यासाठी जवळपास तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत़ या काँक्रिटीकरणाची जाडी ही ३०० एमएम असणार आहे.
पाण्याचा पुनर्वापर होणार
- - चिंचोळी एमआयडीसी येथे विभागीय कार्यशाळा उभारण्यात येत आहे़ यामध्ये सिव्हिज ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आला आहे़ यामध्ये सर्व वापरलेले खराब पाणी स्वच्छ करण्यात येणार आह़े.
- - हे स्वच्छ केलेले पाणी गाड्या धुण्यासाठी वापरण्यात येणार आहे़ याचबरोबर या ठिकाणी गाड्या धुण्यासाठी दोन रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे.
चालू वर्षामध्ये विभागीय कार्यशाळा चिंचोळी एमआयडीसी येथे हलवण्यात येणार आहे़ याचबरोबर नवीन एसटी स्थानक पंढरपूर येथे बांधण्यात येत आहे़ याचबरोबर पंढरपूरच्या जुन्या एसटी स्थानकात काँक्रिटीकरणाचे कामही लवकरच पूर्ण होईल़
- रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, सोलापूर