सोलापूर जिल्हा परिषदेचे नवी व्यवस्था; आता गावोगावी मिळणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 05:57 PM2021-09-23T17:57:35+5:302021-09-23T17:57:42+5:30
नवी व्यवस्था : बुधवारी ३९ हजार जणांनी घेतला डोस
सोलापूर : कोरोना प्रतिबंधक लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्याने आता आरोग्य विभागाचे पथक गावोगावी जाऊन लसीकरण करणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. लसीकरणाला वेग येण्यासाठी व कोणीही वंचित राहू नये यासाठी आता गावोगावचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. २७ सप्टेंबरपासून गावनिहाय लसीकरण शिबिर ठेवण्याचे आरोग्य विभाग नियोजन करीत आहे. सीईओ स्वामी यांनी ज्येष्ठ नागरिक व महिला, दिव्यांगांचे प्राधानक्रमाने लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना दिल्या. त्याप्रमाणे यंत्रणा लावली जाणार आहे.
जिल्ह्यात बुधवारी ३९ हजार ९९ जणांनी डोस घेतले. यात शहरी भागात ६ हजार १६४ जणांनी पहिला व १ हजार ३१६ जणांनी दुसरा असे ७ हजार ४८० जणांनी डोस घेतले. ग्रामीण भागात २७ हजार ४२० जणांनी पहिला तर, ४ हजार १९९ जणांनी दुसरा असे ३१ हजार ६१९ जणांनी डोस घेतले. अशाप्रकारे जिल्ह्यात १६ लाख १२ हजार १३६ जणांनी पहिला व ५ लाख १७ हजार १६३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण २१ लाख २९ हजार २९९ इतके लसीकरण झाले आहे.