कोरोनाच्या नव्या लाटेने सोलापूर शहराला घेरले; मार्चमध्ये ४ हजार ५५ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 11:28 AM2021-04-03T11:28:16+5:302021-04-03T11:30:19+5:30
चिंताजनक : मृत्यूदर मात्र घटला; ५०० हून अधिक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र
सोलापूर : कोरोनाच्या नव्या लाटेने शहराला घेरले आहे. मार्च या एकाच महिन्यात गेल्या एक वर्षाच्या सर्वाधिक ४ हजार ५५ रुग्ण आढळून आले आहेत. ५०० हून अधिक जागा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या महिन्यातील मृत्यूदर केवळ १.७ टक्के राहिला.
सोलापूर शहरात १३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णवाढीचा आलेख वाढतच राहिला. मागील वर्षी जुलैमध्ये सर्वाधिक २६७६ रुग्ण आढळून आले. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सरासरी ५०० ते ६०० रुग्ण आढळून आले. मार्च महिन्यात मात्र ४ हजार ५५ रुग्ण आढळून आले आणि ६९ जणांचा मृत्यूही झाला. एप्रिलच्या दोन दिवसांतील स्थिती चिंताजनक आहे. या दोन दिवसांत ४०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. एका ठिकाणी तीन किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास महापालिका त्या जागेला, इमारतीला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे. शहरात अशा ५०० हून अधिक जागा आहेत.
मृत्यूदर घटतोय, मात्र ज्येष्ठांची काळजी आवश्यक
मागील वर्षी काही महिन्यात सोलापूरचा मृत्यूदर राज्यात अव्वल होता. मे २०२० मध्ये १०.५८ टक्के, जून महिन्यात ११.४६ टक्के मृत्यू दर होता. मार्च महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले असले तरी मृत्यूदर मात्र कमी दिसत आहे. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही अनेक ज्येष्ठ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठांची काळजी घेणे आवश्यक आहे, असे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दूधभाते म्हणाले.
बाधितांमध्ये १६ ते ५० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण अधिक
शहरातील एक वर्षात १६ हजार ६२९ रुग्ण आढळून आले. यात ३१ ते ५० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण ३५.५३ टक्के आहे तर १६ ते ३० वयोगटातील व्यक्तींचे प्रमाणही २०.९९ टक्के आहे. कोरोनाने १६ ते ५० वयोगटातील रुग्णांवरच मोठा हल्ला केला आहे.