नव्या वर्षात ३४ जणांना माराव्या लागणार पोलीस ठाण्याच्या चकरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:23 AM2021-01-03T04:23:26+5:302021-01-03T04:23:26+5:30
३१ डिसेंबर साजरी करण्यासाठी अनेकजण सहकुटुंब घराबाहेर पडतात. तसेच तरुण वर्गही मोठ्या प्रमणात मद्य प्राशन करुन ३१ डिसेंबर दिवशी ...
३१ डिसेंबर साजरी करण्यासाठी अनेकजण सहकुटुंब घराबाहेर पडतात. तसेच तरुण वर्गही मोठ्या प्रमणात मद्य प्राशन करुन ३१ डिसेंबर दिवशी मौजमस्ती करतात. मुलींची छेडछाड होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलीस प्रशासनाने शहरातील महत्त्वाच्या चौकात नाकाबंदी केली होती. त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांना वेळेत हॉटेल बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
तालुका पोलिसांनी अहिल्यादेवी चौक, तीन रस्ता चौक, गोपाळपूर चौक, तारापूर नाला, ग्रामीण पोलिसांनी वाखरी चौक, सातारा रस्ता, कोर्टी या परिसरात नाकाबंदी केली होती.
पंढरपूर शहरात १९, तालुका पोलीस ठाणे ५ व ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत ५, करकंब ठाण्यांतर्गत ५ अशा एकूण ३४ जणांवर मद्य प्राशन करुन वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. वरील २९ जणांची वाहने जप्त केली आहेत. न्यायालयाच्या आदेशाने वाहन मालकांना पुन्हा वाहन मिळणार असल्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार व पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी सांगितले.
१२ अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई
गुरसाळे, पोहरगाव, शेगाव दुमाला, तारापूर, देगाव, रोपळे, सरकोली, मगरवाडी, तपकिरी शेटफळ या गावात अवैध दारु व्यवसायावर कारवाई केली. या कारवाईमध्ये देशी-विदेशी, हातभट्टी दारू व सिंदी जप्त करण्यात आली. यामध्ये एकूण १९० देशी-विदेशी दारुच्या बाटल्या, ४१८ हातभट्टी दारू बाटल्या व सिंधी असा २२ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये १२ अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.