POSITIVE 2020; पंढरीत नव्या वर्षात दर्शन मंडप, स्काय वॉकच्या कामाला होणार सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 02:38 PM2020-01-01T14:38:03+5:302020-01-01T14:46:48+5:30
गोरगरीब भाविकांना कमी पैशात राहण्याची चांगली सोय करून देण्यासाठी नवीन भक्तनिवास
सचिन कांबळे
पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरीत येणाºया भाविकांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सरत्या वर्षात केले आहे. येणाºया वर्षात देखील अनेक नियोजित कामांना सुरुवात होणार आहे. यामध्ये १२ कोटी रुपयांचा स्काय वॉक व २२ कोटी ५० लाख रुपयांचे दर्शन मंडपाचे काम सुरू होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली़
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहायक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, नगराध्यक्षा साधना भोसले, माधवी निगडे, ह़ भ़ प़ ज्ञानेश्वर जळगावकर महाराज, मंदिर समितीचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, सध्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह अन्य सदस्यांनी मंदिर समितीच्या माध्यमातून विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय घेतले होते.
यामध्ये गोरगरीब भाविकांना कमी पैशात राहण्याची चांगली सोय करून देण्यासाठी नवीन भक्तनिवास उपलब्ध करून देण्यात आले. आषाढी व कार्तिकी यात्रेत दर्शन रांगेतील भाविकांना फराळ, खिचडी, चहा व शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करून देण्यात आली. मंदिरामध्ये लोखंडी बॅरिकेड्सऐवजी स्टीलचे बॅरिकेडिंग करण्यात आले. तसेच मंदिराला पुरातन रूप प्राप्त व्हावे, यासाठी मंदिराचा भिंतींचे रंग काढण्यात आले. यासह अन्य कामे करण्यात आली आहेत.