रात्रीत झाले बार्शी डिजिटलमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:19 PM2018-05-11T12:19:39+5:302018-05-11T12:19:39+5:30

नगरपालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त मोहीम, आता डिजिटलला परवानगी नाही

Nightly Barshi Digital Free | रात्रीत झाले बार्शी डिजिटलमुक्त

रात्रीत झाले बार्शी डिजिटलमुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देडिजिटल बोर्ड लावल्यास त्याच्यावर कारवाई - पोलीसबार्शी शहर डिजिटलमुक्त करण्याचे माझे मिशन - विश्वासराव साळोखे

शहाजी फुरडे-पाटील 
बार्शी : मुळातच अरुंद असलेल्या बार्शी शहरात गेल्या काही वर्षांपासून डिजिटल फलकांचे पेव फुटले होते. त्यामुळे शहरातील विविध चौकात वेडेवाकडे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे, विद्रुपीकरण करणारे डिजिटल फलक मोठ्या दिमाखात झळकत होते़ यावर कोणाचाच पायबंद नव्हता; मात्र गेल्या आठवड्यात बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वासराव साळोखे यांनी शहरातील वाहतूक व डिजिटलचा विषय हाती घेत उपाययोजना सुरु केल्या आहेत़ याचाच एक भाग म्हणून गुरूवारी रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत डिजिटल हटाव मोहीम राबवून एका रात्रीत शहरातील शंभरापेक्षा जास्त डिजिटल काढून टाकले. 


बार्शी शहरात सर्वच राजकीय पक्ष, शिक्षण संस्था, क्लासेस, महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथी, विविध व्यावसायिक, युवानेते, भावी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे, जाहिरातींचे भव्य डिजिटल शहरातील विविध चौकाचौकात लावले होते. प्राधान्याने हे डिजिटल बसस्थानक चौक, जुना गांधी पुतळा, यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह, हांडे गल्ली चौक, शंकेश्वर उद्यान चौक, बाळेश्वर नाका, नगरपालिकेसमोर, लहुजी वस्ताद चौक, कॅन्सर हॉस्पिटल चौक, हिरेमठ हॉस्पिटल चौक, भोसले चौक, शिवाजी कॉलेज परिसर, हायवे स्टॉप, गांधीनगर स्टॉप या शहरातील प्रमुख भागासह संपूर्ण शहरात मोठमोठे डिजिटल फलक लावून शहराचे विद्रुपीकरण झाले होते़ नगरपालिकेनेदेखील डिजिटलमुक्त बार्शी करण्याचा ठरावही केला होता़ मात्र त्याची अंमलबजावणी काही होत नव्हती़ 

नव्याने पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले विश्वासराव साळोखे यांनी वाहतूक व्यवस्था व डिजिटलमुक्त बार्शी हा मुख्य अजेंडा हाती घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे व विनापरवाना लावलेले डिजिटल काढण्याची मोहीम बुधवारी रात्री अचानक सुरू केली.

या मोहिमेत बसस्थानक चौक, तुळजापूर रोड, पोस्ट चौक, बाळेश्वर नाका, कुर्डूवाडी  नाका, शिवाजी कॉलेज चौक, अलीपूर रोड, उपळाई रोड, परंडा  नाका, शासकीय आयटीआय, एकविराई चौक, तानाजी चौक,  हांडे गल्ली चौक, कचेरी रोड, भीमनगर रोड, फुलवार चौक, आझाद चौक, भोसले चौक, हिरेमठ हॉस्पिटल या सर्व भागातील डिजिटल काढून टाकले. केवळ डिजिटलच न काढता त्यासाठी तयार केलेले बांबूचे सांगाडेदेखील काढून टाकण्यात आले़

कोणत्याच डिजिटलला परवानगी नाही
- स्वच्छ भारत अभियानांतर्गत बार्शी शहर डिजिटलमुक्त करण्याचे माझे मिशन असून, शहराचे विद्रुपीकरण करणारे, वाहतुकीला अडथळा आणणारे डिजिटल काढून टाकण्यात आले आहेत़ यापुढील काळात शहरात कोणत्याच प्रकारचे डिजिटल फलक लावण्यास आमच्याकडून परवानगी देण्यात येणार नाही़ याबाबत आम्ही नगरपालिकेलादेखील तसे कळविणार आहोत़ त्यामुळे यापुढील काळात कोणीच कसल्याही प्रकारचे डिजिटल बोर्ड लावल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल़ त्यामुळे आपले शहर सुंदर दिसावे तसेच कायदा व सुव्यवस्था उत्तम राहावी, यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे़, असे आवाहन पोलीस निरीक्षक विश्वासराव साळोखे यांनी केले आहे.

यांनी केली कारवाई 
- ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वासराव साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शमीम शेख, पोलीस उपनिरीक्षक अन्वर मुजावर यांच्यासह नगरपालिकेचे मिळकत व्यवस्थापक महादेव बोकेफोडे, लिपिक संतोष कांबळे, बापू बनसोडे, मच्छिंद्र राऊत व पोलीस स्टेशनचे ५० कर्मचारी व नगरपालिकेच्या १० कर्मचाºयांनी केले़ 

Web Title: Nightly Barshi Digital Free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.