पाणीटंचाईसाठी नऊ कोटींची मागणी
By admin | Published: July 16, 2014 01:03 AM2014-07-16T01:03:12+5:302014-07-16T01:03:12+5:30
उपजिल्हाधिकारी : १५ आॅगस्टपर्यंत पाणीटंचाई नाही
सोलापूर: शहरात तसेच ग्रामीण भागातील पाणीसाठ्यांमध्ये पुरेसे पाणी असल्यामुळे १५ आॅगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही; मात्र जिल्ह्यात २१२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिली़
महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची पाणीटंचाईसंदर्भात पाटील यांनी मंगळवारी बैठक घेतली़
यावेळी महापालिकेने पाणीटंचाईचा ८७ लाख ८७ हजारांचा आराखडा दिला आहे़ उजनीतील पाणीपातळी खाली गेल्यास १५ आॅगस्टपासून उजनीतून दुबार पाणी पंपिंग करण्यासाठी ३७़३८ लाख, हिप्परगा दुबार पंपिंगसाठी ७़९० लाख, विंधन विहिरी घेण्यासाठी २४़९४ लाख, विंधन विहिरीवर पंप बसविण्यासाठी १५़६५ लाख असा ८५़८७ लाखांचा मनपाने टंचाई आराखडा दिला आहे तर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १७ कोटींचा टंचाई आराखडा दिला आहे़
उजनीमधील पाणीपातळी सध्या वजा २६ टक्के असून १५ आॅगस्टपर्यंत पाऊस न पडल्यास पाणीटंचाई जाणवणार आहे़ सर्व पाणीसाठे फक्त पिण्यासाठी आरक्षित केल्याची माहिती पाटील यांनी दिली़ पाऊस न पडल्यास महापालिकेसाठी उजनीतून साडेचार टीएमसी पाणी सोडावे लागेल; मात्र याबाबत शासन निर्णय घेईल, असेही त्या म्हणाल्या़
--------------------
पंढरपूर वगळता सर्व तालुक्यांमध्ये सध्या पिण्यासाठी टँकर सुरू केले आहेत़ सर्वाधिक ४९ टँकर मंगळवेढ्यात असून, ते भरण्यासाठीदेखील पाणी नसल्यामुळे सांगोल्यात टँकर भरावे लागत आहे़ टँकरची संख्या २१२ झाली आहे़ सध्या तरी पाणीसाठे फक्त पिण्यासाठी राखीव ठेवले आहेत. त्यामुळे पाऊस न पडला तर १५ आॅगस्टनंतर पाणीटंचाई जाणवेल़
- ज्योती पाटील
उपजिल्हाधिकारी, नरेगा
--------------------------
मनपासाठी ८५ लाखांचा आराखडा
महापालिकेसाठी ८५.८७ लाखांचा पाणीटंचाई आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. उजनी जलाशयातून दुबार पंपिंगसाठी ३७.३८ लाख, हिप्परगाव तलावातून दुबार पंपिंगसाठी ७.९० लाख, विंधनविहरी घेण्यासाठी २५ लाख त्यावर पंप बसविण्यासाठी १५ लाख या कामांचा आरखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.