सोलापूरचा नितीन जपतोय अठराव्या शतकापासूनच्या पत्रसंग्रहाचा अनमोल खजिना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 02:57 PM2018-10-09T14:57:32+5:302018-10-09T15:04:39+5:30
सोलापुरातील नितीन कृष्णानंद अणवेकर या तरूणाने मात्र या रद्दी झालेल्या पत्रातच वैभव शोधले आहे.
गोपालकृष्ण मांडवकर
सोलापूर - हा छंद जीवाला लावी पिसे म्हणतात, ते काही खोटे नाही. टपालातून आलेली पत्रे वाचल्यावर सर्वांच्याच दृष्टीने तशी क्षुल्लकच. मात्र सोलापुरातील नितीन कृष्णानंद अणवेकर या तरूणाने मात्र या रद्दी झालेल्या पत्रातच वैभव शोधले आहे. जाईल तिथून जुनी पत्रे शोधणाऱ्या या युवकाच्या संग्रही आज दीड हजारांवर पत्रे असून अठराव्या शतकापासून तर थेट कालपरवापर्यंत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या पत्रांचा दुर्मिळ खजिना त्याने जोपासला आहे.
दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नितीनचा व्यवसाय सराफाचा आहे. सोमवारी गुमास्ता असल्याने घरी निवांत बसण्याऐवजी तो रद्दीची दुकाने शोधतो. त्यात जुनी पत्रे शोधत फिरतो. त्याच्या संग्रही आज उर्दू, तेलगु, कन्नड, फारशी, इंग्रजी, मोडीलिपी भाषेतील कितीतरी जुनी पत्रे आहेत. ही पत्रे म्हणजे एक इतिहास असून त्यातून जुन्या काळातील संदर्भ, समाजजीवन आणि व्यावसायिक संदर्भ सापडतील, असा त्याचा दावा आहे.
शालेय जीवनात लहानपणापासूनच त्याला ही सवय जडली. या पत्रसंग्रहासोबतच मान्यवरांची पत्रे गोळा करण्याचा वेगळा छंदही त्याने जोपासला आहे. यशवंतराव चव्हाण यांचे १६ जुलै १९७५ मधील एक पत्र त्याच्या हाती लागले. तेव्हापासून तो या छंदाकडे वळला. छत्रपती घराणे, बिकानेर संस्थान, राणी एलिझाबेथ, यांच्यापासून तर माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, अटलबिहारी वाजपेयी, तर संभाजीराजे भोसले, प्रियंका चोप्रा, अभिषेक बच्चन, इस्ट इंडिया कंपनीचा पत्रव्यव्यवहारही त्याच्याकडे आहे. इंग्लडच्या राजघराण्यासोबतही त्याचा पत्रव्यवहार असतो. त्यांची स्वाक्षरीनिशी असलेली अनेक पत्रे त्याने फ्रेम करून ठेवली आहेत. या सोबतच फर्स्ट डे कव्हर असलेली जवळपास ६०० टपाल तिकीटेही नितीनने संग्रही करून ठेवली आहेत.