Nitin Gadkari: ...अन् अक्कलकोट चौपदरीकरण झाले, नितीन गडकरींनी आईंची इच्छा पूर्ण केली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 11:38 AM2022-04-27T11:38:03+5:302022-04-27T11:44:49+5:30
अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास गडकरी यांनी सपत्नीक समर्थांचे दर्शन घेतले
अक्कलकोट : राज्याचा सार्वजनिक बांधकाममंत्री असताना माझ्या आई अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता आल्या होत्या. प्रवासादरम्यान सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर रस्ता अत्यंत खराब जाणवला. अक्कलकोटचा रस्ता चौपदरीकरण व्हावा, अशी तिने अपेक्षा व्यक्त केली होती. योगायोगाने संबंधित खात्याचा मंत्री झालो, सोलापूर-अक्कलकोट रस्त्याचे चौपदरीकरण झाले अन् आईचे स्वप्नही नकळतपणे पूर्ण झाल्याचे समाधान गडकरी यांनी शब्दातून व्यक्त केले.
अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास गडकरी यांनी सपत्नीक समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन, नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते गडकरी यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. याचवेळी वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील स्व. कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे दर्शन व सभामंडपाचे उद्घाटनदेखील नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी देवस्थानच्या अतिथी कक्षात झालेल्या चर्चेदरम्यान गडकरींनी नागपूरमधील स्वामीधामच्या नव्या उपक्रमांचा शुभारंभ आणि महेश इंगळे यांच्या उपस्थितीबाबत आठवणींनाही उजाळा दिला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, नगरसेवक महेश हिंडोळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, शिवशरण अचलेर उपस्थित होते.