मनपा आरोग्य अधिकारी वैद्य यांना डच्चू!

By Admin | Published: June 10, 2014 12:27 AM2014-06-10T00:27:40+5:302014-06-10T00:27:40+5:30

एका पत्रामुळे मामला उघड: लाचलुचपत विभागाकडून दोनवेळा अटक, महिलेचे शोषणही भोवले

NMC health officer dropped to Vaidya | मनपा आरोग्य अधिकारी वैद्य यांना डच्चू!

मनपा आरोग्य अधिकारी वैद्य यांना डच्चू!

googlenewsNext

सोलापूर:महापालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी कंत्राटी पद्धतीने नियुक्त झालेले प्रभारी आरोग्य अधिकारी एम़ एम़ वैद्य यांना या आठवड्यात घरचा रस्ता धरावा लागणार आहे़ लाचप्रकरणी एक नव्हे दोन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यामुळे अटकेत राहिलेले, निलंबित झालेले आणि महिला लैंगिक शोषणात वादग्रस्त ठरलेल्या वैद्य यांनी नियुक्तीच्या वेळी ही माहिती उजेडात येऊ दिली नाही़ आयुक्तांकडे आलेल्या एका पत्रामुळे ही भानगड उघड झाली असून नवा आरोग्य अधिकारी नेमण्यासाठी मंगळवारी मुलाखती होणार आहेत़
दोन ते तीन महिन्यांपूर्वी वैद्य यांना आरोग्याधिकारी म्हणून मनपामध्ये कंत्राटी पद्धतीने नेमले होते़ यापूर्वी ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे कार्यरत होते़ अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाकडे मेडिकल आॅफिसर असताना दोन हजार रुपयांची लाच घेताना २००५ साली ते लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकले होते़ या प्रकरणी ते निलंबित झाले होते़
पांगरी (बार्शी) येथील ग्रामीण रुग्णालयात ५०० रुपयांची लाच घेतानाही त्यांना २०११ साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते़ स्त्री कर्मचाऱ्याच्या लैंगिक शोषण प्रकरणातही ते वादग्रस्त ठरले होते, कीटकनाशक खरेदीमध्येही त्यांनी मोठा घोटाळा केल्याचे पत्र पांगरी येथील प्रमोद बसनगर यांनी आयुक्तांना दिले होते़
आयुक्तांनी याबाबत वैद्य यांना थेट विचारले़ वैद्य यांनीही कबूल केले, त्यामुळे त्यांना काढून टाकण्याचा आयुक्तांनी निर्णय घेतला असून या पदासाठी मंगळवारी मुलाखती घेण्यात येणार आहेत़ आयुक्त मुंबईला जाणार असल्यामुळे सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील या मुलाखती घेणार आहेत़ गेल्या महिन्यात उघड झालेल्या गर्भपातप्रकरणीदेखील वैद्य यांची भूमिका संशयास्पद होती. बाहेरील डॉक्टर मनापासून काम करीत नाहीत़ कंत्राटी पद्धतीने असल्यामुळे त्यांनी घोटाळा केला तर फंड, ग्रॅच्युईटी आणि पेन्शन नसल्यामुळे त्यांच्याकडून कोणतीही वसुली करता येत नाही, त्यामुळे या पदी मनपातील डॉक्टराची नियुक्ती करावी, अशी मागणी पुढे येत आहे़
---------------------
अर्धा डझन आरोग्याधिकारी
महापालिकेत आरोग्य अधिकारी हे शासकीय पद आहे़ परंतु बाहेरील कोणताही अधिकारी महापालिकेत येण्यास तयार नाही, त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून हे पद रिक्त आहे़ त्यामुळे दर दोन-तीन महिन्याला या पदाची संगीत खुर्ची सुरू असते़ गेल्या वर्षभरात डॉ़ जयंती आडके, शहाजी गायकवाड, प्रसन्नकुमार या मनपा डॉक्टरांसह डॉ़ डागा, वैद्य या बाहेरील डॉक्टरांना देखील आरोग्य अधिकारी म्हणून नेमले़ आता त्यांना घरी जावे लागणार आहे़
----------------------------------
महापालिकेत कंत्राटी पद्धतीने प्रभारी आरोग्याधिकारी म्हणून नियुक्ती करताना वैद्य यांनी सदरची माहिती सांगितली नाही़ एका पत्रामुळे त्यांच्या पूर्वीच्या गैरबाबी पुढे आल्या़ त्यांनी त्या कबूलही केल्या़ त्यामुळे त्यांच्या ठिकाणी नवा आरोग्याधिकारी नेमण्यासाठी मंगळवारी मुलाखती घेण्यात येत आहेत़
-चंद्रकांत गुडेवार
मनपा आयुक्त

Web Title: NMC health officer dropped to Vaidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.