नो तूट.. नो कमिशन भाव चांगला बळीराजा खुश, अडतीकडं धावला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:25 AM2021-09-24T04:25:57+5:302021-09-24T04:25:57+5:30
अक्कलकोट बाजार समितीमध्ये आतापर्यंत ३६ हजार ९९७ क्विंटल उडदाची आवक झाली. सुरुवातीला ७ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर शेतकऱ्यांना ...
अक्कलकोट बाजार समितीमध्ये आतापर्यंत ३६ हजार ९९७ क्विंटल उडदाची आवक झाली. सुरुवातीला ७ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर शेतकऱ्यांना मिळाला. सध्या ७ हजार २०० रुपयांपर्यंत दर स्थिर राहिला आहे. डाग असलेल्या धान्याला किमान ५ हजार प्रतिक्विंटल दर मिळतो आहे. इथल्या बाजार समितीतून अक्कलकोट, इंडी, अफझलपूर, आळंद अशा अक्कलकोट तालुक्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागातील काही गावांतूनही उडदाची आवक होत आहे. काटा होताच पेमेंट मिळत असल्याने शेतकऱ्यांना मधून समाधान व्यक्त होत आहे. प्रतिक्विंटल घेण्यात येणारे अडत कमिशन हे खरेदीदाराकडून घेतले जात आहे. तूट, कमिशन शेतकऱ्यांकडून काहीच घेतले जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना ओढा वाढत असल्याचे सांगण्यात आले.
दुधनी बाजार समितीत आतापर्यंत ३३ हजार क्विंटल उडदाची आवक झाले असून, सुरुवातीला प्रतिक्विंटल ७ हजार ६०० रुपये दर मिळाला असून, सध्या ७ हजार ३०० दर मिळत आहे. खराब धान्याला पाच हजार भाव दर आहे. येथे आळंद, अफझलपूर, अक्कलकोट तालुक्यातील काही भाग, तुळजापूर आदी ठिकाणाहून शेतकरी आपला माल घेऊन येतात. या बाजार समितीत अक्कलकोटच्या तुलनेत येणारी आवक आणि मिळणारा दर चांगला असतो. सध्या उडदाचे सिझन अंतिम टप्प्यात आले आहे.
दोन्ही बाजार समितीतील उडीद तामिळनाडू, चेन्नई, हैद्राबाद, राजस्थान, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यात सर्रासपणे विक्रीसाठी पाठवला जात आहे.
-----
परजिल्ह्यातल्या बळीराजाचा ओढा
अक्कलकोट बाजार समितीत यंदाच्या सिझनमध्ये ६ हजार २३७ क्विंटल उडदाची आवक झाली. शेतकऱ्यांना त्यास ६ हजार ७५० रुपयांचे दर मिळाला आहे. अक्कलकोट, दुधनी येथील बाजार समितीत चांगला दर मिळत असल्याने परजिल्ह्यातील शेतकरी आकर्षित होत आहे. त्यामुळे खरीप धान्य विक्रीसाठी आणण्याचे प्रमाण वाढले आहे. कधीही सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांचे धान्य बाजारात येते, त्यांना चांगला दर मिळतो हे अनेक वर्षांपासून आलेले अनुभव शेतकऱ्यांना आहेत.
फोटो- २३ अक्कलकोट अडत
अक्कलकोट येथील बाजार समितीत उडदाचे सौदे होताना.