सुट्टीच्या दिवशी सोलापूर जिल्हा परिषदेत नो एन्ट्री; मुख्य दरवाज्याला कुलूप
By शीतलकुमार कांबळे | Published: August 16, 2023 06:12 PM2023-08-16T18:12:21+5:302023-08-16T18:12:46+5:30
वरिष्ठांच्या परवानगीनेच प्रवेश
सोलापूर : पारशी नववर्ष प्रारंभ दिनानिमित्त बुधवार १६ ऑगस्ट रोजी शासकीय सुटी होती. सीईओ मनिषा आव्हाळे यांनी दिलेल्या आदेशानुसार सुटी असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. यामुळे सुटीच्या दिवशी कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
अनेक कार्यालयामध्ये कर्मचारी हे उशीरा आल्याच्या तक्रारी समोर येत असतात. मात्र, सोलापूर जिल्हा परिषदेत कर्मचारी कार्यालयीन वेळेच्या आधी येतात, रात्री उशीरापर्यंत कार्यालयात थांबतात. यावर सीईओ मनिषा आव्हाळे यांनी आदेश काढले असून पूर्वपरवानगी शिवाय लवकर आल्यास व उशीरा गेल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सीईओ मनिषा आव्हाळे या कर्मचारी व अधिकारी यांच्या कामात शिस्त आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषदेमध्ये अनेक कर्मचारी व अधिकारी हे वेळेआधी येणे, उशीरा जाणे तसेच सुटीच्या दिवशीही कामावर येत असल्याचे सीईओंच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी या प्रकारावर आळा घातला आहे. कामानिमित्त वेळेआधी यावे असल्यास व उशीरा जावे लागत असल्यास कार्यालय प्रमुखांची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.