coronavirus; अंत्यसंस्काराचे साहित्य मिळेना; ३३ तास मृतदेह ठेवावा लागला घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 01:06 PM2020-03-23T13:06:20+5:302020-03-23T13:17:44+5:30
मोदीतील वाहनचालकाची दुर्दैवी कहाणी; रिक्षाचालकाच्या बाळाच्या अंत्यसंस्काराला चारच लोक
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : दुर्धर आजाराने घेरल्याने युवकाने जीव सोडला..क़र्ताच गेल्याने कुटुंब पोरके झाले़..कोरोनाविरोधात सरकारने केलेल्या आवाहनामुळे कोणीच बाहेर पडेना..क़र्नाटकातीत पाहुणेही पोहोचेनात... भरीस भर म्हणून की काय अंत्यसंस्कारासाठीचे साहित्य दुकानही बंद...अशा जटील परिस्थितीत अडकलेल्या कुटुंबाने वाहनचालकाचा अंत्यविधीच चक्क ३३ तास पुढे ढकलला.
ही दुर्दैवी कहाणी आहे सिद्धेश्वर साईबाबा जमादार (वय ३०, रा. मधुकर उपलप वस्ती, शासकीय गोडावूनजवळ) असे दुर्धर आजाराने मरण पावलेल्या वाहनचालकाचे नाव आहे.
सिद्धेश्वरचे वडील साईबाबा हेदेखील वाहन चालवतात. गरिबीशी तोंड देत सिद्धेश्वरने थोडेफार शिक्षण घेतले़ त्यानंतर तोही वाहन चालवायला शिकला़ काही दिवसांपूर्वी त्याला कर्करोग जडल्याचे तपासणीत स्पष्ट झाले़ यातून तो बरा होऊ शकला नाही़ होटगी रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी मध्यरात्री १ वाजता त्याने शेवटचा श्वास घेतला.
दरम्यान, या सप्ताहाभरापासून कोरोनाविरोधात सर्वत्र हालचाली सुरु होत्या़ या काळात सर्वसामान्यही बाहेर पडायला टाळताहेत़ २२ मार्च रोजी कोणीही सकाळी ६ ते रात्री ९ यादरम्यान बाहेर पडू नका, असे सरकारने आवाहन केले़ या आवाहनानुसार आदल्यादिवसापासूनच सीमावर्ती भागात नाकेबंदी सुरु झाली. वाहनेदेखील जवळपास बंद झालेली. अशातच सिद्धेश्वरच्या अंत्यविधीसाठी त्याच्या नातेवाईकांना विजयपूर, रायचूर आणि मंद्रुप परिसरातून येण्यासाठी त्यांना वाहन उपलब्ध होईना. इकडे आजही कुटुंबीय दूरवरच्या पाहुण्यांची वाट पाहताहेत. शिवाय जवळच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी अंत्यसंस्काराचे साहित्य आणायला बाहेर पडले़, परंतु कोरोनाविरोधात बाजारपेठाही बंद. अंत्यसंस्काराचे साहित्य पुरविणारेही दुकान बंद असल्याने रविवारी सकाळी त्याच्या आईवडिलांनी अंत्यविधीच चक्क ३३ तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
रिक्षाचालकाच्या बाळाच्या अंत्यसंस्काराला चारच लोक
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळताना दुसरा अनुभव आला तो रिक्षाचालकाच्या बाबतीत. जिजामातानगर येथील विश्वास सोनवणे यांच्या पत्नी गरोदर होत्या़ रुग्णालयात त्या प्रसूत झाल्या़ या एक दिवसाच्या अर्भकाचाही मृत्यू झाला़ सिद्धेश्वर जमादारच्या वाटेला आलेली परिस्थिती सोनवणे यांच्या वाटेला आली़ त्यांचे डॉक्टर बंधू, आई आणि विश्वास असे चौघेच स्वत:च्या रिक्षातून मोदी स्मशानभूमीत आले़ कोरोनाच्या भीतीने कोणीच बाहेर पडले नाही़ काहींनी जमावबंदीचा अर्थ दंगलीतील ‘कर्फ्यू’सदृश स्थिती असा काढून बाहेर पडणे टाळले़ अंत्यसंस्कार आटोपून सोनवणे कुटुंबाने मोदीतून घरची वाट धरली़
विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार
दरम्यान, मोदी येथील स्मशानभूमीत डोकावले असता दोन दिवसांत अंत्यसंस्कार हे सरणावरती करण्याऐवजी विद्युतदाहिनीवर भर दिला़ शनिवारी या स्मशानभूमीत तीन मृतदेह जाळण्यात आले तर दोन मृतदेहांचे अंत्यसंस्कार विद्युतदाहिनीत करण्यात आले़ रविवारीदेखील एक अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीत तर एकाला सरणावरती भडाग्नी देऊन अंत्यसंस्कार उरकण्यात आले़ हे सारे परिणाम केवळ कोरोनाचे असल्याच्या प्रतिक्रिया स्मशानभूमीची देखभाल करणाºयांतून उमटल्या़