हजार चकरा मारल्यानंतरही मिळेना मदत; कर्जाच्या परतफेडीसाठी सोलापूर सोडलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 07:35 PM2022-02-24T19:35:15+5:302022-02-24T19:35:21+5:30
दिव्यांगांच्या व्यथा :
सोलापूर : दिव्यांग भगिनी भाग्यलक्ष्मी गुंडला या सध्या मेहबूब नगर येथील हॉटेलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करीत आहेत. त्यांचा जन्म सोलापुरात झाला. सोलापुरात त्या वाढल्या. विवाहानंतर दोन मुलेही त्यांना झाली. पतीच्या अकाली मृत्यूनंतर त्या बेघर बनल्या. महापालिकेकडे अनेक वर्षे पाठपुरावा करूनदेखील त्यांना मदत नाही मिळाली. मुलीच्या लग्नानंतर कर्ज झालं. कर्जाच्या परतफेडीसाठी त्यांना सोलापूर सोडावं लागलं.
असे एक ना अनेक दिव्यांग बांधवांना उपेक्षित आणि दारिद्र्यमय जीवन जगावे लागत आहे. ना याकडे प्रशासनाचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचे. शहर हद्दीत राहणाऱ्या अंबुबाई बुधले या दिव्यांग आहेत. त्यांचे पती सुशीलकुमार हे देखील दिव्यांग असून, कोविड काळात त्यांना उपासमारीचा सामना करावा लागला. मानधनासाठी महापालिकेच्या चकरा मारून दोघेही थकले आहेत. बाळे येथील दिव्यांग भगिनी अर्चना भगवत चौरे यांचीही हीच अडचण आहे. यांना प्रतिमहिना पाचशे रुपयांची मदत मिळत होती. मागील वीस महिन्यांपासून त्यांना मानधन मिळेना.
-----------
कौटुंबिक पातळीवर अवहेलना...
सरकारी यंत्रणेच्या मानसिकतेला लकवा मारल्यामुळे दिव्यांग त्यांच्या न्यायिक हक्कापासून वंचित राहत आहेत. दिव्यांग बांधवांना कौटुंबिक पातळीवरदेखील अवहेलना सहन करावी लागते. त्यामुळे त्यांना शासकीय यंत्रणेकडून मिळणाऱ्या मदतीवर शंभर टक्के अवलंबून राहावे लागते. सरकारकडून मिळणारी मदत त्यांच्यासाठी जादुई दिवापेक्षा कमी नाही. दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी महापालिका, जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारंवार आंदोलने होतात. याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचे.
-----------
बीजभांडवल योजनेचाही लाभ मिळेना...
जिल्हा परिषदेकडून दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार बीजभांडवल योजना राबविली जाते. या योजनेचे फक्त २३ लाभार्थी आहेत. योजनेंतर्गत कर्जावर वीस टक्क्यांची सबसिडी मिळते. तसेच जिल्हा परिषदेकडून व्यंग अव्यंग विवाह योजना राबविली जाते. व्यंग असलेल्या व्यक्तीसोबत अव्यंग व्यक्तीने विवाह केल्यास त्यांना पन्नास हजारांची मदत मिळते. या योजनेचे फक्त १४ लाभार्थी आहेत. मागच्या वर्षी फक्त ३४ बांधवांनीच या योजनेचा लाभ घेतला. दिव्यांग बांधवांच्या विवाहाकरिता प्रशासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
.............................
- शहरात एकूण दिव्यांग : ८ ते १० हजार
- महापालिकेतील लाभार्थी : २ हजार
- दिव्यांग स्वयंरोजगार बीजभांडवल योजना, जिल्हा परिषद : २३ लाभार्थी
- व्यंग अव्यंग विवाह योजना : १४ लाभार्थी