नो जॉब... नो डीएड - बीएड; बाराशे जागांसाठी आले फक्त पाचशे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 03:53 PM2021-09-15T15:53:30+5:302021-09-15T15:53:41+5:30
भरती नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी; शिक्षकाची नोकरी नको रे बाबा, विद्यार्थ्यांचे मत
सोलापूर : मागील अनेक वर्षांपासून न झालेली शिक्षक भरती व शासनाच्या विविध बदललेल्या नियमावलीमुळे विद्यार्थ्यांचा डीएड आणि बीएड या अभ्यासक्रमासाठीचा ओढा कमी झाला आहे. यामुळेच मागील पाच ते दहा वर्षांत या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी चाळीस हजारांवरून आता बाराशेपर्यंत घसरले आहेत. सध्या जिल्ह्यात १२०० जागांसाठी फक्त पाचशे अर्ज आले आहेत.
पूर्वी डीएड, बीएड म्हणजे हमखास नोकरी मिळतेच, अशी एक भावना विद्यार्थ्यांमध्ये तयार झाली होती; पण त्यानंतर टीईटी व अभियोग्यता चाचणी बंधनकारक करण्यात आली. याचबरोबर जवळपास दहा वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. यामुळे डीएड आणि बीएड केलेले लाखो विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. सोबतच काही वर्षांपूर्वी डीएडच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्याने महाविद्यालयांची संख्या वाढली होती; पण नोकरभरती नसल्यामुळे ती महाविद्यालये ओस पडली आहेत.
...अन्यथा आंदोलन
शासनाने विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्य, अशा शाळांना परवानगी दिली. यामुळे अनेक शिक्षकांना मानधनतत्त्वावर काम करावे लागत आहे. समाजाचा कणा असलेले भविष्यातील शिक्षक जगण्यासाठी आज मिळेल ते काम करत आहेत. यामुळे दरवर्षी शिक्षक भरती विनाअडथळा घेतली जावी, टीईटीप्रमाणे शिक्षक भरती व्हायलाच पाहिजे; अन्यथा पुढील काळात संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डीएड व बीएड स्टुडंट असो.चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत शिरगूर यांनी दिला आहे.
राज्यात शिक्षकाची रिक्त पदांची संख्या मोठी आहे. पात्रता सिद्ध करूनही अनेक जण बेरोजगार आहेत. देशाच्या जडणघडणीत शिक्षकाची भूमिका खूपच महत्त्वाची असते. रिक्त पदांची संख्या बघून शासनाने दरवर्षी भरती प्रक्रिया राबवायला हवी. शाळेत जर विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच मिळाले नाहीत, तर विद्यार्थ्यांचे भविष्य कसे घडणार हा प्रश्न निर्माण होतो, याचा शासनाने विचार करावा. शासनाच्या अशा उदासीन धोरणामुळे आजही विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवत आहेत.
-मल्लीनाथ गौडगाव, विद्यार्थी
उच्चशिक्षण घेऊनही ना नोकरीची, ना शिक्षक भरती होण्याची काही हमी आहे. उच्चशिक्षण घेऊनही अनेक मुली या आज चूल आणि मूल यामध्ये अडकून आहेत. आज आम्ही पूर्ण शिक्षण घेऊनसुद्धा शिक्षक होण्याचे काहीच मार्ग दिसत नाही म्हणूनच ‘शिक्षक होणे अन् शिक्षकाची नोकरी नको रे बाबा’ असे वाटत आहे.
-पूजा कमळे, विद्यार्थिनी
मागील दहा वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. सोबतच पूर्वी डीएड झाल्यानंतर नोकरीची शाश्वती होती, ती सध्या राहिली नाही. यामुळे २०१० पासून डीएडमध्ये जाण्याचा ट्रेंड बदलला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमापासून दुरावत आहेत. यंदा अर्ज करण्यासाठी कमी कालावधी मिळाल्यामुळे प्रवेश अर्जांची संख्या घटली आहे.
-राम ढाले, प्राचार्य, एसव्हीसीएस कॉलेज
सध्या शिक्षक भरती कमी झाली व टीईटीबाबत विद्यार्थ्यांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, या अभ्यासक्रमाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. यामुळे हुशार विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे पर्यायी क्षेत्र म्हणून पाहत आहेत; पण हुशार विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे येणे गरजेचे आहे. असे विद्यार्थी या क्षेत्रात आल्यास त्यांना लवकरच नोकरी लागण्याची शक्यता जास्त आहे.
-डाॅ. रामचंद्र कोरडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळापूर
- एकूण अर्ज संख्या ५०४
- एकूण जागा १२७०
- एकूण डीईएलईडी महाविद्यालये २९