मराठी आत्मसात केल्यास कोणतीही भाषा अवघड नाही, गो़ मा़ पवार यांचे मत, सोलापूरात मराठी भाषा दिन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:32 PM2018-02-28T13:32:36+5:302018-02-28T13:32:36+5:30

१३ व्या शतकात महानुभव पंथांच्या काळात मराठी भाषेचा उदय झाला. संस्थापक चक्रधर स्वामींनी मराठीला धर्मभाषेचा दर्जा दिला. मराठी आत्मसात केल्यास जगातील कोणतीही भाषा अवगत करणे अवघड नाही.

No language is difficult when you adapt Marathi, Go Mawar Pawar's opinion, Marathi language day program in Solapur | मराठी आत्मसात केल्यास कोणतीही भाषा अवघड नाही, गो़ मा़ पवार यांचे मत, सोलापूरात मराठी भाषा दिन कार्यक्रम

मराठी आत्मसात केल्यास कोणतीही भाषा अवघड नाही, गो़ मा़ पवार यांचे मत, सोलापूरात मराठी भाषा दिन कार्यक्रम

Next
ठळक मुद्देकवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरानिश इंटरटेनमेंट, पुणे निर्मित ज्ञानभाषा मराठी हा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम झाला संत ज्ञानेश्वर, बहिणाबाई यांनी औपचारिक शिक्षण न घेताही मराठी भाषेचा गौरव वाढविला


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २८ : १३ व्या शतकात महानुभव पंथांच्या काळात मराठी भाषेचा उदय झाला. संस्थापक चक्रधर स्वामींनी मराठीला धर्मभाषेचा दर्जा दिला. मराठी आत्मसात केल्यास जगातील कोणतीही भाषा अवगत करणे अवघड नाही, असे मत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांनी व्यक्त केले. 
कवी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो. या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव जी. आर. मंझा होते. यावेळी मंचावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, शिक्षण सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे, विशेष कार्यासन आधिकारी डॉ. व्ही. बी. पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. बालाजी शेवाळे, विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक यू. व्ही. मेटकरी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने, डॉ. टी. एन. कोळेकर, डॉ. अनिल घनवट उपस्थित होते. 
डॉ. गो. मा. पवार पुढे म्हणाले की, संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा किती गोड व सामर्थ्यशाली, सौंदर्यशाली आहे याचा प्रत्यय ज्ञानेश्वरीतून दिला. तुकाराम महाराजांनी तर मराठीला जागतिक दर्जा मिळवून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकोशागृहातील सर्व व्यवहार मराठीतून सुरू केला. नंतर इंग्रजी भाषेचे मराठीवर आक्रमण झाले. मात्र काही इंग्रज भाषा तज्ज्ञांनी मराठी भाषेतील ज्ञानाची व्याप्ती वाढविण्यासाठी योगदान दिले. आपल्या भाषेतूनच विद्यार्थ्यांच्या मनाची जडण-घडण होते, सर्जनशीलता जोपासली जाते. त्यामुळे माध्यमिक शाळांपर्यंतचे शिक्षण मराठीतूनच दिले जावे. मराठी भाषेचे संवर्धन करताना इतर कुठल्याही भाषेशी वैर करण्याचे कारण नाही. इतर भाषांच्या संपर्कात राहून मराठी भाषा समृद्ध करावी. माध्यमिक शाळेपर्यंतचे शिक्षण मराठीतूनच द्यावे, असेही यावेळी डॉ. गो. मा. पवार यावेळी म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव जी. आर. मंझा म्हणाले की, मराठी भाषेच्या संवर्धनाची सुरुवात घरापासून व्हावी. मराठीत संवाद, इतर भाषांतील शब्दांचा वापर टाळणे यातून मराठीचा वापर वाढू शकतो. पालकांना आई-बाबा असे म्हणण्यापासून ही सुरुवात व्हावी. लक्ष्मीनारायण बोल्ली फक्त अकरावी शिकले होते; पण मराठी, तेलुगू, कन्नडसह कितीतरी भाषांतून त्यांनी श्रेष्ठ साहित्य निर्मिती केल्याचेही त्यांनी सांगितले.
राजेश पांडे आपल्या भाषणात म्हणाले की, संत ज्ञानेश्वर, बहिणाबाई यांनी औपचारिक शिक्षण न घेताही मराठी भाषेचा गौरव वाढविला. मराठी भाषा संपन्न व विविध भागात वेगवेगळ्या प्रकारे मराठी बोलली जाते. पण संकल्प केला पाहिजे की, उत्सव म्हणून न पाहता मराठीचे वैभव वाढविण्यासाठी सतत कार्य करावे. प्रास्ताविक शिक्षण सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे केले. सूत्रसंचालन विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले तर आभार डॉ. व्ही. बी. पाटील यांनी मानले.
---------------------------
सांस्कृतिक कार्यक्रमाने मराठी दिन बहरला...
- निश इंटरटेनमेंट, पुणे निर्मित ज्ञानभाषा मराठी हा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती प्रशांत देसाई व मिलिंद ओक यांची होती. दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. संहिता डॉ. समीर वसंत कुलकर्णी यांची होती. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, अमित वझे, राहुल सोलापूरकर यांनी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या निवडक उताºयांचे अभिवाचन केले. या कार्यक्रमात पंडित विजय कोपरकर, चैतन्य कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर, स्वरदा गोडबोले, स्वरप्रिया बेहेरे आदी मान्यवरांनी गायन केले. वादक म्हणून राजीव परांजपे, जितेंद्र कुलकर्णी, प्रशांत पांडव, आदित्य आपटे यांनी साथ दिली. कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते विजय पटवर्धन व विनोद खेडकर यांनी नाट्यप्रवेश सादर केले. नृत्याच्या विविध कार्यक्रमात कुणाल फडके, ऐश्वर्या काळे, ऋतुजा इंगळे, अभिषेक हावरगी, सुमित गजमल यांनी नृत्य सादर केले.

Web Title: No language is difficult when you adapt Marathi, Go Mawar Pawar's opinion, Marathi language day program in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.