ना लेआऊट, ना परवानगी; तरीही उभारले बाळूमामा मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:23 AM2021-09-03T04:23:19+5:302021-09-03T04:23:19+5:30
आदमापूर (ता.भुदरगड, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी उंदरगाव ग्रामपंचायतीकडे एका लेखी पत्रान्वये मनोहर चंद्रकांत भोसले यांच्या सुरू असलेल्या मठ ...
आदमापूर (ता.भुदरगड, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी उंदरगाव ग्रामपंचायतीकडे एका लेखी पत्रान्वये मनोहर चंद्रकांत भोसले यांच्या सुरू असलेल्या मठ बांधकाम व श्री बाळूमामा मंदिर बांधकामासाठी त्यांनी ग्रामपंचायतीकडून घेतलेला बांधकाम परवाना, तसेच प्लॅन लेआउटला मंजुरी घेतली असल्यास ज्या त्या वेळच्या परवानगीच्या प्रति व अन्य तपशिलाची माहिती मागितली होती. त्यानुसार गुरुवारी उंदरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शितल हनुमंत नाळे व ग्रामसेवक वाय.बी. कुदळे यांनी उंदरगाव ग्रामपंचायतीकडे मनोहर भोसले यांनी मठाच्या व श्रीबाळूमामा मंदिर बांधकामाबाबत कोणत्याही परवानगीचा अर्ज किंवा बांधकाम संदर्भात नकाशे अर्ज केलेला नाही, त्यामुळे परवानगी दिलेली नाही, असे पत्र आदमापूर ग्रामपंचायतीस पाठविले आहे.
.......
अद्याप तक्रार आलेली नाही
उंदरगाव येथील मठ व मंदिर बांधकाम परवानगीसंदर्भात आमच्या कार्यालयाकडे अद्याप कुठली तक्रार आलेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर योग्य ती चौकशी करून नियमाप्रमाणे कार्यवाही करू.
- समीर माने, तहसिलदार, करमाळा
.......
उंदरगावच्या ग्रामस्थांनी घेतली पोलिसांकडे धाव
मनोहर भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन उंदरगाव ग्रामस्थांवर पार्किंगच्या खोट्या आरोपामुळे गावची बदनामी झाली आहे. त्यांच्याविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी उंदरगावचे ॲड. मनोजकुमार कांबळे, धनंजय कांबळे, नामदेव कांबळे, दशरथ खोटे, जनार्दन सरडे, हर्षवर्धन कांबळे, वसंत झाकणे आदींनी पोलिस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्याकडे केली. पोलिसांनी या सर्वांचे उशिरापर्यंत जबाब घेतले.
........
रेखा लोंढे तक्रारीनंतर पोलिसांकडून जागेची पाहणी
दौंड येथील रेखा सुनील लोंढे यांनी करमाळा पोलिसात दिलेल्या तक्रारी अर्जात उंदरगाव येथील जमीन गट नं. ८४ चा २ आमच्या संमतीशिवाय दस्त केला गेला आहे. तो मुळात बेकायदा आहे, यासंदर्भात विचारणा केली असता जीवे ठार मारण्याची व संपूर्ण जमिनीवर कब्जा करण्याची धमकी दिली आहे. या तक्रारी अर्जाची नोंद पोलिसात झाल्याने आज सायंकाळी उंदरगाव येथे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व जिंती दूरक्षेत्रचे सहायक पोलीस निरीक्षक भुजबळ यांनी चौकशीसाठी प्रत्यक्ष जमिनीत जाऊन पाहणी केली.
........
अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
उंदरगाव येथील स्वयम घोषित बाबाने दैवी चमत्काराचा दावा करून लोकांना फसविल्याच्या तक्रारी असल्यामुळे तसेच जबरदस्तीने जमीन बळकावणे, नागरिकांकडून पैसे उकळणे सुरू केल्यामुळे त्यांची जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत चौकशी व्हावी, अशी मागणी अंनिस शाखेच्यावतीने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. अशोक कदम, व्ही.डी. गायकवाड, निशा भोसले, प्रा. केद्रारीनाथ सुरवसे, यशवंतराव फडतरे, डॉ. अस्मिता बालगावकर, विनायक माळी, प्रमोद माळी, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, अंजली नानल, उषा शहा उपस्थित होते.
....
फोटो ओळ : मनोहर भोसले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झालेले उंदरगावचे ग्रामस्थ.
......
फोटो ०२ करमाळा उंदरगाव