आता दु:खात नको हेलपाटा; कोड स्कॅन करताच मिळेल मृत्यूचा दाखला
By Appasaheb.patil | Published: February 26, 2023 01:56 PM2023-02-26T13:56:39+5:302023-02-26T13:56:58+5:30
सोलापूर महापालिकेची मोबाईलवर सुविधा : नाव, वयाची अचूक नोंद मात्र आवश्यक
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर शहरात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा दाखला काढण्यासाठी अनेकांना हेलपाटे व अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हेच हेलपाटे व अडचणी कमी करण्यासाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखला विभागाने सहज, सोप्या पद्धतीने मृत्यू दाखला मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. महापालिकेने मृत्यू दाखला मोबाइलवर मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे. शिवाय क्यूआर कोड स्कॅनचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, शहरात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृत्यू दाखला कसा काढायचा याबाबतची माहिती नसते. त्याबाबत आता महापालिका प्रचार, प्रसार अन् जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. मृत्यू दाखला काढताना फॉर्म ४ अ स्मशानभूमी परवाना, स्मशानभूमीची पावती, मयत व्यक्तीचे आधार कार्ड, अर्जदाराचे आधारकार्ड ही कागदपत्रे जोडून सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा. अर्जदाराने स्वत:चा मोबाइल नंबर व ईमेल द्यावा. जेणेकरून मयत व्यक्तीचा दाखला मेलवर येईल व तो कायमस्वरूपी जतन राहील, अशा पद्धतीने अर्ज केल्यास मयत व्यक्तीचा दाखला मिळण्यास विलंबही होणार नाही.
एखादी व्यक्ती घरी मयत झाली असेल तर जवळच्या डॉक्टरांना बोलावून मयत घोषित करावे. जेणेकरून फॉर्म ४ अ मिळण्यास अडचण येणार नाही. जर काही मेडिकल्स असेल तर सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून पुढील कार्यवाही होईल व अशा मयत व्यक्तींचा दाखला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे.
स्मशानभूमी परवाना घ्यावा...
एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर ज्या स्मशानभूमीत विधी करणार आहोत त्याचे नाव सांगून जवळील सोलापूर महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातून स्मशानभूमी परवाना घ्यावा. स्मशानभूमीत गेल्यावर मयत व्यक्तीचे अचूक नाव, वय, नोंद वहीत नोंदवावे व रितसर पावती घ्यावी, असेही आवाहन महापालिकेने केले आहे.
मृत्यू दाखलाही डीजी लॉकरला...
महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात सीआरएस प्रणाली आहे. त्यात एक क्यूआर कोडपण दिला जातो, त्यावरून दाखलाही स्कॅन करू शकता. जर आधार नंबर टाकला तर दाखला हा डीजी लॉकर सिस्टीमला जोडला जातो. तेव्हा हॉस्पिटलमधून ऑनलाइन एन्ट्री होत असताना आधार नंबर टाकला की नाही याचीपण खात्री करून घ्या, ई-मेलवर आलेल्या लिंकमधून कलर प्रिंट व झेरॉक्स काढून घेऊ शकता.