नवा स्ट्रेन नाही; पुण्याहून प्रवास करून सोलापुरात आलेल्यांना होतोय कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:53 PM2021-03-26T12:53:14+5:302021-03-26T12:54:26+5:30
सावधान : ३१ ते ४० वयोगटातील लोकांना होतोय कोरोना
सोलापूर : पुणे जिल्ह्यालगत असलेल्या तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबई व पुण्याहून प्रवास करून आलेल्यांना बाधा होत असल्याचे दिसून आले आहे ,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी लोकमत शी बोलताना दिली.
ग्रामीण भागात सध्या पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा व बार्शी या तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. पंढरपूर, बार्शी, माळशिरस तालुक्यातील रुग्णवाढ ही कायम राहिली आहे. मार्च महिन्यात हे प्रमाण तिपटीने वाढले आहे. या तालुक्यातील बरेचसे नागरिक विविध कामानिमित्त पुणे व मुंबईला प्रवास करतात. तसेच पंढरपूर हे तीर्थक्षेत्र तर बार्शीत व्यापारपेठ असल्याने अनेकजण येत असतात. या प्रवासामुळे बाधितांचे प्रमाण वाढत चालल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणावरून दिसून येत आहे.
विशेष धक्कादायक बाब म्हणजे या महिन्यात ३१ ते ४० वयोगटातील लोकांना अधिक बाधा झाल्याचे दिसून येत आहे. लग्न व इतर कार्यक्रम, घरगुती कामे, नोकरी व रोजगारासाठी या वयोगटातील मंडळी सतत घराबाहेर पडत असतात. या मंडळीच्या प्रवासामुळे घरातील ज्येष्ठ मंडळींना प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तरुण मंडळींनी प्रवास करताना व केल्यावर अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. बाहेर फिरताना मास्क वापरा, वारंवार हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा व गर्दीत जाणे टाळा ही त्रिसूत्री अवलंबने गरजेचे असल्याचे डॉ. जाधव यांनी म्हटले आहे. रुग्ण वाढत असल्याबाबत पाच तालुक्यातील नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल आलेला नाही.
निवडणुकीला गर्दी नको
पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालयात ११० जण उपचार घेत असून, क्षमता संपली आहे. त्यामुळे ६५ एकरात कोविड सेंटर सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. पोटनिवडणुकीमुळे पंढरपूर तालुक्यात गर्दीत होत आहे. याबाबत खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी सांगितले.
वयोगटानुसार पॉझिटिव्ह रुग्ण
जिल्हा आरोग्य विभागाच्या २२ मार्चच्या अहवालनुसार वयोगटानुसार पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. १ ते १० वर्षे : १७१३, ११ ते २० वर्षे : ४०४५, २१ ते ३० वर्षे :८२२०, ३१ ते ४० वर्षे : ८६८४ ४१ ते ४९ : ७०२९, ५१ ते ६० : ५५३५, ६० वर्षावरील : ७६०९.