ना शाळा, ना परीक्षा, तरीही सोलापूर जिल्ह्यातील आठ लाख विद्यार्थी झाले पास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 02:21 PM2021-06-24T14:21:18+5:302021-06-24T14:21:27+5:30
ऑनलाईन पद्धतीने झाले शिक्षण : शहरापेक्षा ग्रामीण भागात नेटवर्कच्या अडचणी
सोलापूर : कोरोनामुळे गतवर्षी पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू झालेच नाहीत. पाचवी ते बारावीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू झाले. मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या. सुरुवातीला पहिली ते नववी व अकरावी त्यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करून सरसकट सर्वांना पास करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील आठ लाख ५७ हजार १५१ विद्यार्थी पास झाले आहेत.
प्रत्यक्ष वर्ग सुरू नसल्याने यावर्षीही ऑनलाईन शाळा सुरू झाल्या आहेत. ज्या गावात नेटवर्कची समस्या आहे, त्याठिकाणी पालक, ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष अध्यापन सुरू आहे. ऑनलाईनमध्ये वेळेची मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना किती आकलन झाले आहे, हे समजणे अवघड आहे. गतवर्षी सहामाहीपर्यंत पाचवी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या. पहिली ते चौथीपर्यंत मात्र एप्रिलपर्यंत ऑनलाईन अध्यापन सुरू होते. वार्षिक परीक्षा रद्द झाली. मात्र, सहामाही व दोन चाचणी परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या. ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांनी तर गुणांचा पाऊसच पाडला शिवाय सरसकट पासचा मात्र सर्व विद्यार्थांना फायदा झाला.
डिसेंबर २०२० मध्ये शासनाने नववी-दहावीच्या शाळा सुरू केल्या. त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा सुद्धा प्रयत्न होता. परंतु कोरोनामुळे तो फसला. मार्चनंतर जिल्ह्यात कोरोनाची लाट इतकी उसळली की, हजारो लोकांचे जीव गेले. शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची रिस्क घेतली नाही. तिसऱ्या लाटेच्या भीतीने शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला नाही. पण शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
----
वर्गनिहाय विद्यार्थी...
- पहिली - ७०६०६
- दुसरी - ७६१६७
- तिसरी - ७६०९८
- चौथी - ७७३११
- पाचवी - ७७१९७
- सहावी - ७६४२०
- सातवी - ७६२६७
- आठवी - ७४६४३
- नववी - ७६५७६
- दहावी - ७१०५०
- अकरावी - ५११२०
- बारावी - ५३६९६
------------
फायदे
- कोरोनाचा प्रादुर्भावामुळे परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थी कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहिले.
- ऑनलाईन शिक्षणाचे फायदे कोरोनाच्या संसर्गात शिक्षण सुरू राहण्यासाठी ऑनलाईन शिक्षण हे एकमेव माध्यम ठरू शकले.
- ऑनलाईन वर्गात शिक्षकांचा एखादा मुद्दा न समजल्यास, रेकॉर्ड केलेले लेक्चर विद्यार्थी पुन्हा पाहू शकतो. अभ्यासातील काही गोष्टी समजल्या नाही, तर गुगलवर सोप्या भाषेत शोधू शकतो.
----
तोटे....
- ऑनलाईन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. शाळा बंद, शिक्षकांचे मार्गदर्शन नाही. अशा परिस्थितीत त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले.
- नेटची सुविधा, अनेक विद्यार्थ्यांकडे पालकांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे दैनंदिन अभ्यास विद्यार्थ्यांना करता आला नाही.
- शाळांकडून विद्यार्थ्यांना दररोज गृहपाठ, पेपर देण्यात येत होते. यात अडचणी आल्या. शहरी भागातील विद्यार्थ्यांचे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या तुलनेने फारसे शैक्षणिक नुकसान झाले नाही.
----------
- जिल्हा परिषद शाळा - २७९८
- अनुदानित शाळा - १०४३
- विनाअनुदानित शाळा - १५०
- शहरातील शाळा - ३९०
- इतर शाळा - ६९३
----
शहरे आणि गाव
ऑनलाईन शिक्षणात ग्रामीण भागात सर्वात मोठी अडचण संसाधनांची आहे. त्याचबरोबर नेटवर्क कनेक्टीव्हीटीचा सुद्धा मोठा त्रास आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षक असो की विद्यार्थी यांनी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे ग्रामीणमध्ये अनेक विद्यार्थी गेल्या सत्रात शिक्षणापासून वंचित होते. शहरामध्ये काही नामांकित शाळेत ऑनलाईन शिक्षण झाले. पण विद्यार्थ्यांनी त्यांना किती सकारात्मक प्रतिसाद दिला. याचे मूल्यांकन होऊ शकले नाही. परीक्षा झाली असती तर ऑनलाईन शिक्षणाची सकारात्मकता दिसून आली असती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.