वेगळा विदर्भ नको; कुटुंबासारखे एकत्र राहू
By Admin | Published: June 9, 2014 12:59 AM2014-06-09T00:59:14+5:302014-06-09T00:59:14+5:30
कवी नारायण कवठेकर : मराठी साहित्यिकांची राजकीय समज पोरकट
सोलापूर : वेगळा विदर्भ होईल का?, यावर चर्चा होईल तेव्हा मी नको, असेच म्हणेन. आपण सारे मोठ्या कुटुंबाप्रमाणे एकत्र राहू. स्वतंत्र राज्याची मागणी, ही राजकीय आहे. राजकीय लोकांना दुसरे कोणते काम नसते. म्हणूनच ते अशी मागणी करत असतात, असे स्पष्ट मत विदर्भातील ज्येष्ठ कवी नारायण कवठेकर - कुलकर्णी यांनी आज येथे व्यक्त केले.
कवी दत्ता हलसगीकर स्मृती समितीच्या वतीने कवठेकर-कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पुस्कार समितीचे अध्यक्ष विवेक घळसासी यांनी आपल्या भाषणात आता विदर्भही आमच्यावर अन्याय करेल, असे वक्तव्य केले होते. तो धागा पकडून कवठेकर - कुलकर्णी यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, वेगळ्या विदर्भाची मागणी होत असतानाच आता वेगळ्या मराठवाड्याचीही मागणी झाली आहे. एका धरणाच्या पाण्यासाठी झालेल्या आंदोलनात चाळीस एक आंदोलनकर्त्यांनी ही मागणी केली होती. चाळीसचे चारशे होण्याला वेळ लागणार नाही. या मागणीलाही जोर धरला जाईल.
आपण जी भाषा बोलतो, तिची अवस्था आज चिंताजनक आहे. ही भाषा बहुसंख्यांनी बोलली पाहिजे. नवी दिल्लीत मराठीचा स्वर बुलंद झाला पाहिजे, असे स्पष्ट करून कवठेकर - कुलकर्णी म्हणाले, विदर्भावर अन्याय होतो म्हणजे काय? अन्याय आम्ही करू देतो. विदर्भातील लोक आळशी आहेत, असाही एक आरोप होतो; पण आम्ही सुखी आहोत म्हणून आळशी आहोत, अशीही टिपण्णी त्यांनी केली. विदर्भावर हिंदी भाषेचा प्रभाव आहे; पण मराठी बोलू नका, असे कुणी सांगितले आहे काय? संस्कार फक्त मातृभाषेतूनच होत असतात. अन्य कोणत्याही भाषेतून नाही, असे ते म्हणाले.
सामान्य माणूस राजकारणविरहित राहू शकत नाही. कवीचेही तसेच आहे. राजकारण ही समाज आणि व्यक्तीजीवनावर प्रभाव टाकणारी संस्था आहे. तिची प्रतिक्रिया व्यक्त करणे, हा कवीचाही भाव असतो. त्यामुळे राजकारणाचे अनुभव कविता, कादंबरीत आले पाहिजेत; मात्र आपल्या साहित्यिकांची राजकीय समज पोरकट आहे, अशी टीका त्यांनी केली.
-------------------------------------------
काव्यक्षेत्रात बाजार
पाऊस, चांदणे, ढग हे कवितांचे विषय आहेत. पाऊस पडू लागता की कवीच्या भावना दाटून येतात.डोळ्यातून आसवं घळघळू लागतात; पण पाऊस जर जीवन उद्ध्वस्त करत असेल तर पावसावर कविता कशी लिहिणार? असा सवाल करून काव्यक्षेत्रात बाजार मांडला आहे. पैसे देवून काव्यसंग्रह छापून घेतले जातात. पुरस्कार मिळविले जातात. या कवींना तुकाराम आणि नरेंद्रचे नाव घेण्याचा काय अधिकार, असाही प्रश्न कवठेकर - कुलकर्णी यांनी उपस्थित केला.