राज्यातील एकही साखर कारखाना विकणार नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची आश्वासन, सोलापुरात बंद कारखान्यांसंदर्भात झाली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 05:21 PM2018-02-01T17:21:33+5:302018-02-01T17:23:18+5:30
दुष्काळी परिस्थितीमुळे व कर्जाच्या ओझ्याने राज्यातील अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत असून यापैकी एकाही साखर कारखान्याची विक्री केली जाणार नाही, उलट पुढील वर्षीच्या हंगामासाठी बंद असलेल्या कारखान्यांपैकी किमान १० कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : दुष्काळी परिस्थितीमुळे व कर्जाच्या ओझ्याने राज्यातील अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत असून यापैकी एकाही साखर कारखान्याची विक्री केली जाणार नाही, उलट पुढील वर्षीच्या हंगामासाठी बंद असलेल्या कारखान्यांपैकी किमान १० कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा व तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्वावर किंवा भागीदारीत चालविण्यासाठी देण्यासाठी सोलापुरात झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. बैठकीला आमदार राणाजगजितसिंह पाटील, आ. सुजितसिंह ठाकूर, साखर संचालक किशोर तोष्णीवाल, सहसंचालक अशोक गाडेंसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील काही साखर कारखाने अनेक वर्षांपासून बंद आहेत. या साखर कारखान्यांवर असलेले बँकांचे कर्ज वरचेवर वाढत असून, कारखान्यांवर अवसायक नेमले आहेत. बँकांनी थकबाकीमुळे काही कारखान्यांची मालमत्ता ताब्यात घेतली असून, काही कारखाने कारवाईच्या विरोधात डी.आर.ए.टी. (कारखानदारीबाबत वित्तीय न्यायालय) मध्ये गेले आहेत. काहीकेल्या कर्ज भरणेही शक्य नाही व कारखानेही सुरू होत नसल्याने असे कारखाने सुरू करण्यासाठी बँका, अवसायक व साखर आयुक्तांशी चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी ही बैठक बोलावली होती, असे सहकार मंत्र्यानी सांगितले. बंद असलेल्या कारखान्यांसंदर्भात विभागनिहाय बैठका घेऊन मार्ग काढण्यात येईल, असेही सहकार मंत्र्यांनी सांगितले. बैठकीत उस्मानाबाद व अन्य जिल्ह्यातील अन्य बंद कारखान्यांबाबत चर्चा झाली. बैठकीला उस्मानाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, उपाध्यक्ष कैलास नेटके, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, तुळजाभवानी कारखान्याचे अवसायक सुदाम रोडगे, तेरणा कारखान्याचे अवसायक विजय घोणसे-पाटील, सहायक निबंधक विकास जगदाळे आदी उपस्थित होते.
--------------------
तेरणा, तुळजाभवानीवर ३९७ कोटी कर्ज
- ढोकीच्या तेरणा सहकारी साखर कारखान्यावर मुद्दल १२७ कोटी ३१ लाख १२ हजार, व्याज १५० कोटी २५ लाख ८४ हजार असे २७७ कोटी ५६ लाख ९६ हजार कर्ज व नळदुर्गच्या तुळजाभवानी कारखान्यावर मुद्दल ४८ कोटी ३१ लाख ३० हजार व व्याज ७१ कोटी २८ लाख २० हजार असे ११९ कोटी ५९ लाख ५० हजार कर्ज आहे. थकबाकीमुळे या कारखान्यांवर अवसायक नेमले असून, कारखाने भाडेतत्वावर किंवा भागीदारीत चालविण्यासाठी ही बैठक सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात झाली.