coronavirus; ३१ मार्च नव्हे...आता १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार रेल्वेची प्रवासी वाहतूक
By appasaheb.patil | Published: March 26, 2020 12:13 PM2020-03-26T12:13:43+5:302020-03-26T12:15:22+5:30
रेल्वे बोर्डाची घोषणा; जीवनाश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मालगाड्यांची वाहतूक सुरू राहणार
सोलापूर : करोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री पूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर भारतीय रेल्वेने ही १४ एप्रिलपर्यत देशभरात धावणा-या सर्व प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सर्वत्र धावणा-या मेल, एक्सप्रेस, प्रीमियम, पॅसेजर गाड्या १४ एप्रिल पर्यत रद्द करण्यात येत असल्याची घोषणा बुधवारी रेल्वे बोर्डाने केली.
यापूर्वी भारतीय रेल्वेने २२ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२० पर्यत सर्व गाड्या रद्द करण्याची घोषणा केली होती. देशातील विविध भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मालगाड्यांची वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. सर्व रेल्वे गाड्यां १४ एप्रिल २०२० च्या रात्री १२ वाजे पर्यतच्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सर्व स्थानकावरील आरक्षित काउंटर्स (पीआरएस) अनारक्षित तिकीट काउंटर्स १४ एप्रिल-2020 पर्यंत बंद राहतील. रेल्वे स्थानकाबाहेरील अधिकृत तिकीट आरक्षण केंद्रे सध्या बंदच राहणार आहेत. यामुळे प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यासाठी धावपळ करू नये. आॅनलाइन पध्दतीने तिकीटे काढलेल्यांचा परतावा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. ज्यांनी तिकीट खिडकीवरून काढली असतील, त्यांना परतावा मिळवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.